तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावर केंद्रावर जाऊन लसीकरण करुन घ्यावे : गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. ०५ : फलटण शहर व तालुक्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने मास्क, सॅनिटायझर वापर आणि सोशल डिस्टंसिंग यासाठी प्रबोधन, प्रसंगी दंडात्मक कारवाई करण्यात येत असतानाच सोमवार दि. ५ एप्रिल पासून शहर व तालुक्यातील ४५ वर्षे वयावरील सर्व ग्रामस्थ आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ ग्रामस्थांना प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून कोविड लसीकरण करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी त्याबाबत नियोजनाची माहिती घेऊन आपल्या गावासाठी नियुक्त केलेल्या केंद्रावर जाऊन लसीकरण करुन घ्यावे, सोबत आधार कार्ड घेऊन जावे असे आवाहन फलटण पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांनी केले आहे.

लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी तालुक्यात ३५ नोडल ऑफिसर्स नियुक्त करण्यात आले असून आरोग्य खात्याचे अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने लसीकरण मोहिम नियोजन व पूर्तता यासाठी हे नोडल ऑफिसर्स काम करतील असे सांगून सर्व संबंधीतांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, ग्रामपंचायत कार्यालय येथून आपल्या गावासाठी असलेल्या लसीकरण कार्यक्रमाची माहिती घेऊन त्या केंद्रावर उपस्थित राहुन लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन गटविकास अधिकाऱ्यांनी केले आहे. ग्राम दक्षता समितीने लसीकरणासाठी पात्र व्यक्तींना यासंबंधी माहिती देऊन आपल्या गावातील सर्व पात्र व्यक्तींना लसीकरण करुन घ्यावे अशी अपेक्षा गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांनी व्यक्त केली आहे.

बरड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्य कक्षेत आंदरुड, गुणवरे, जावली, पवारवाडी, गोखळी या ६ ठिकाणी, बिबी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्य कक्षेत आदर्की बु., ढवळ, सासवड, ताथवडा, तरडफ या ५ ठिकाणी, गिरवी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्य कक्षेत दुधेबावी, गिरवी, कोळकी, सोनवडी बु., वाठार १ आणि वाठार २ या ६ ठिकाणी, राजाळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्य कक्षेत राजाळे, विडणी, आलगुडेवाडी, खुंटे, मठाचीवाडी, सोमंथळी या ६ ठिकाणी, साखरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्य कक्षेत चौधरवाडी, फडतरवाडी, होळ, जिंती, निंभोरे, रावडी बु. या ६ ठिकाणी, तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्य कक्षेत हिंगणगाव, काळज, नांदल, पाडेगाव, सालपे, तांबवे या ६ ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली असून या सर्व केंद्रावर लगतच्या गावातील लोकांनी जाऊन लसीकरण करुन घ्यावयाचे आहे. कोणत्या केंद्रावर कोणत्या गावातील लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे त्याबाबत माहिती ग्रामदक्षता समिती व ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध असल्याचे गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांनी सांगितले आहे.

ग्रामपंचायत कार्यालय, दक्षता समिती, ग्रामविकास अधिकारी यांचेकडे नोडल अधिकाऱ्यांची नावे, मोबाईल नंबर उपलब्ध आहेत, त्यांच्याकडे संपर्क केल्यास ते सविस्तर माहिती देऊन लसीकरणाबाबत मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा आहे.

तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दररोज सकाळी १० ते ५ या वेळेत सुट्टीच्या दिवशी देखील आणि सर्व उपकेंद्रावर दिलेल्या वेळापत्रकाप्रमणे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच ४५ वर्षांवरील सर्व ग्रामस्थांनी मनात कोणतीही भीती न बाळगता लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांनी यांनी केलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!