
राजकुमार गोफणे
दैनिक स्थैर्य | दि. ३ मार्च २०२३ | जावली |
तुम्ही वंचितमध्ये जा, आरपीआयमध्ये जा, शिवसेनेत जा, पण पाणी विकणार्या राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या पार्टीत जाऊ नका, असा मिश्किल सल्ला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्ते व मतदारांना दिला आहे.
बरड (ता. फलटण) येथे बरड पंचायत समिती गणातील आठ गावांच्या कार्यकर्ते, मतदार आढावा मेळाव्यात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजपचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे, विशाल माने, संतोष गावडे – पाटील, फलटण तालुका उपाध्यक्ष विलास आटोळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पुढे म्हणाले, या भागामधून १४ टीएमसीचे पाणी जाणार आहे. पाऊण टीएमसी धोम-बलकवडीचे पाणी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे मिळाले. १९९६ ला रामराजे कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष झाले तर १९९७ ला माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर उपाध्यक्ष होते. फलटण बरड येथील वारकरी निवासासाठी ५० कोटींचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. ‘न भूतो न भविष्यती’ असा पालखी मार्ग तयार केला जात आहे. ५० हजार कोटी रुपयांचा महामार्ग पुणे-बेंगलोर फलटण तालुक्यामधून जाणार आहे. धोम-बलकवडीचे चार महिन्यांचे पाणी आता आठमाही होणार आहे. विकासकामांना निधी कमी पडून देणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नाईकबोमवाडी एमआयडीसीचे कामही लवकरच सुरू होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बरड पंचायत समिती गणातील लोकांच्या विविध मागण्यांची निवेदने तसेच लोकांचे प्रश्न जाणून घेतले. यावर निश्चितपणाने प्रश्न सोडवले जातील, असे सांगितले.
यावेळी बरडचे माजी सरपंच जनार्दन लोंढे यांनी आपल्या मनोगतात विविध मागण्या मांडल्या.
युवा नेतृत्व संतोष गावडे पाटील यांनी प्रास्ताविक केले. आनंदा पवार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास बरडचे माजी सरपंच विष्णूपंत गावडे, शरद झेंडे, सचिन पवार, संगीता नलवडे, आनंदा चव्हाण, दीपक गावडे आदींसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.