
दैनिक स्थैर्य । दि. १७ मार्च २०२३ । सातारा । भविष्यात विजेची मागणी वाढत जाऊन तीव्र टंचाई निर्माण होणार आहे . त्यामुळे अपारंपारिक ऊर्जा साधनांचा वापर करण्यावर भर द्यावा लागेल,याकरता सातारकरांनी अशा ऊर्जेचा वापर करून घरपट्टीत सवलत मिळवावी असे आवाहन सातारा पालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासक अभिजीत बापट यांनी केले आहे.
सातारा नगरपरिषद आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत माजी वसुंधरा अभियान 3 राबवली जात आहे. या उपक्रमा अंतर्गत सौरऊर्जेचा वापर आणि त्याला असणारे गुणांकन जास्त असल्यामुळे तसे प्रयोग साताऱ्यात होत आहे . याविषयीची एक कार्यशाळा येथील छत्रपती शिवाजी सभागृहात आयोजित करण्यात आली होती या मेळाव्यासाठी मुख्याधिकारी अभिजीत बापट, स्वच्छ सर्वेक्षण 2023 चे नोडल अधिकारी प्रवीण यादव, गणेश टोपे, स्वच्छ सर्वेक्षणचे सिटी कॉर्डिनेटर नितीन माळवे,विद्युत अभियंता महेश सावळकर, आरोग्य विभाग प्रमुख प्रकाश राठोड, आरोग्य निरीक्षक प्रशांत गंजीवाले ,सागर बडेकर, इत्यादी यावेळी उपस्थित होते.
अभिजीत बापट म्हणाले ऊर्जा ही पंचतत्वा पैकी एक आहे . या तत्त्वांतर्गत सौर ऊर्जा हा महत्त्वाचा घटक आहे सौर ऊर्जा या घटकांतर्गत सार्वजनिक व खाजगी इमारतीवर सौर ऊर्जा यंत्रणा स्थापन करणे वॉटर हिटर बसवणे इत्यादी कृतीचा समावेश होतो या अनुषंगाने स्थानिक महावितरण कार्यालयाशी समन्वय साधून काही गोष्टींचे नियोजन केले जाणार आहे सातारकरांनी सुद्धा अशा यंत्रणांचा वापर करून घरपट्टीमध्ये निश्चित सवलत मिळवावी याविषयीची प्रबोधन कार्यशाळा आणि नागरिकांमध्ये प्रसार व प्रचार इत्यादी मोहीम हाती घेतली जाणार आहे.
या मेळाव्यामध्ये महावितरण प्रतापगंज कार्यालयातील नचिकेत पवार, पांडुरंग कदम या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सौर ऊर्जा यंत्रणा आणि कर्ज उपलब्धता या विषयी माहिती दिली . तसेच नगरपरिषदेमार्फत कर आकारणी मध्ये सवलतीची माहिती नागरिकांना देण्यात आली . या मेळाव्यात सहभागी एजन्सी पैकी शामल एजन्सी सातारा यांचे मार्फत विनोद सूर्यवंशी व श्रेयस बोधे यांनी नागरिकांना सौर पॅनल कसे बसवावे याविषयी मार्गदर्शन केले . फोनिक्स सोलर सिस्टिम प्रायव्हेट लिमिटेड सातारा यांचे मार्फत वसीम शेख यांनी नागरिकांना सोलर वॉटर हीटर संदर्भात माहिती देऊन सौरऊर्जा जनजागृती मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवला . या बहुउपयोगी कार्यक्रमासाठी सातारकर नागरिक उपस्थित होते.