दिवाळीत वेगवेगळे पवित्र मुहूर्त असतात. ज्यापैकी एक म्हणजे भाऊबीजेचा सण .भाऊ बहिणीचे प्रेमाचं प्रतिक असलेल्या या सणाची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात. भावाबद्दल असलेले प्रेम व्यक्त करण्याचा हा सण मोठा आनंद देणारा असतो. या शुभ मुहूर्तावर बहीण आपल्या भावाला ओवाळते. भावाच्या निरोगी आयुष्यासाठी सदिच्छा देते. तर भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी देऊन आपलं प्रेम व्यक्त करतो.परंतु आजकाल जीवन वेगवान झाले आहे आणि लोकांकडे एकमेकांना भेटण्यासाठी किंवा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी फारच कमी वेळ आहे.
त्यामुळे बरेचदा भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा वा सणाच्या शुभेच्छा वॉट्सअँप आणि इतर सोशलमिडिया प्लॅटफॉर्मद्वारे एकमेकांना कळवल्या जातात, कारण लोकांकडे एकमेकांना भेटण्यासाठी कमी वेळ असतो. त्यामुळे बहीण भावाच्या नात्यात कटुता निर्माण होऊ नये म्हणून सदैव एकमेकांच्या संपर्कात रहायचे असते.तसे पाहता लहानपणी बहीण-भावामधील नाते जितके घट्ट असते तितके मोठेपणी का राहत नाही?, त्यांच्यात का दुरावा निर्माण होतो ? हे प्रश्न अलीकडे प्रकर्षाने जाणवत आहेत. लहानपणीचे लहान विश्वसुध्दा खुप मोठे असते ज्यात व्यवहार नसतो आणि पालकांच्या संपत्तीशी काही देणे-घेणे नसते, तर फक्त आनंद साजरा करणे हा शुद्ध भाव असतो, मात्र मोठे झाल्यावर नात्यात व्यवहार येतो आणि घट्ट नाती टिकणे अवघड होते.
उरतो तो फक्त दिखाऊ उपचार. त्यातून भावंडांच्या आर्थिक परिस्थितीत मोठी तफावत निमर्माण होते.लहानपणी आई-वडिल जे काही हातावर टेकवतील ते बहिणीला भाऊबीज म्हणून द्यायचे एवढेच माहिती असते. देताना आनंद असतो, आणि घेताना सुध्दा आनंद असतो .ती वस्तू किती रूपयाची आहे याच्याशी काही घेणेदेणे नसते. बाबांनी मुलाच्या हातात दिलेली नोटसुध्दा बहिणीच्या हातातून आईच्या हातात जाते. काहीवेळाने पून्हा वडिलांच्या हातात जाते. म्हणजे खरे तर व्यवहार काहीच होत नाही आणि नात्यात व्यवहार नसतो, तेव्हा तिथे नक्की आनंद असतो, मात्र मोठेपणी काय आणि किती मिळणार आहे यावर काय आणि किती द्यायचे हे अवलंबून असते, म्हणून नातेबंध कमजोर होतात. माणूस मोठा होतो तसा त्याचा स्वार्थ जास्त मोठा होत जातो व इतर आप्तेष्ट लोकांविषयी त्याचे प्रेम सहसा कमी होत जाते.
त्यात बहीण-भाऊ अशा नात्यात आजकाल दुरावा यायला बहूतांश आपले जोडीदार देखील जबाबदार असतात, कारण ते भावूक विचार करण्यापेक्षा व्यावहारिक विचारास प्राधान्य देतात.मला वाटते बहिणी व भाऊ यांचे नाते विरळ होण्याचे मुख्य कारण म्हणजे मोठे होऊन लग्न झाले की भाऊ बहीण आपआपल्या संसारात इतके गुंतलेले असतात की त्यांना भाऊ बहीण हे नाते दृढ ठेवायला जास्त वेळ मिळत नाही, आणि ते जर वेगवेगळ्या गावी असतील तर भेट फक्त वर्षातून एकदोनदा होते. शिवाय कालांतराने त्यांना मुले व नातवंडे होऊन त्यांचे व्याप वाढतात. वेळ काढणे कठीण होते. तरीही जोपर्यंत आईवडील असतात तोपर्यंत येणे जाणे बऱ्यापैकी असते. बहिणी माहेरी येतात व राहतात. जुन्या आठवणी सगळे एकत्र बसून काढतात. निदान तेवढ्यापुरते तरी नाते टिकून राहते.
अर्थात कधी-कधी या नात्यात काही अडसर येतात. आईवडिलांच्या संपत्तीची वाटणी हा मतभेदाचा मुद्दा अलीकडे वाढत चालला आहे . त्यामुळे काहीवेळा सणापुरतीच दाखवेगिरी राहते पण आतून मने फाटलेली असतात..वडिलार्जित संपत्तीत हक्क ,समान वाटणी करताना पुरुषप्रधान संस्कृतीत मुलीना कमी लेखण्याची प्रथा आहे .तशी ती मुलीची इच्छा असो वा नसो दुसऱ्या अनेकांच्या इच्छा देखील त्यात समाविष्ट होत जातात ..उत्कट भावनेने लांबचा प्रवास करत आलेली मने एकमेकांना दुषणे द्यायला लागतात. माझ्यावर अन्याय झाला हे दुखणे स्वतःसहित अनेकांचे दुःख वाढवत जाते. अलीकडे मुली आपल्या हक्काविषयी जागरूक असल्याने परंपरा नाकारताना दिसतात. शिक्षणाने जागरुक झालेल्या मुली एकोप्याचे सबंध नीट ठेवले नाहीत तर मग आक्रमक देखील होत असतात ..रितिरिवाज परंपरा पाळत नाही म्हणून भाऊ देखील कधी वाटणी मागते म्हणून हीन लेखतात ..एकूणच नात्यात तुसडेपणा वाढत जातो .
आणि यात आणखी लोक समजूतदार पणा न घेता हा जाल वाढवत नेतात. शिवाय लग्नानंतर एकमेकांची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर अपेक्षा वाढत जाते. आर्थिक परिस्थितीतला फरक हे नाते भाऊ बहिणीला दुर नेते.कधी भाऊ हा बहिणीचा बाप म्हणून कर्तव्य पार पाडतो तर बहीणही भावाच्या बाबतीत आई म्हणून कर्तव्य पार पाडते. आजच्या युगात भाऊ म्हणून कर्तव्य पार पाडताना काही ठिकाणी भावाच्या पत्नीचा अडसर येतो. अनेकदा वस्तुस्थिती वेगळी असते परंतु आपण दोष भावाला देतो. या प्रकारे अनेक ठिकाणी बहिणी संपत्तीमध्ये हिस्सा मागतात आणि यामधून वादाला सुरुवात होते मग भाऊही टोकाची भूमिका घेऊन..तू मला मेली..मी तुला मेलो, अशी भाषा वापरून सर्व बंधने तोडतो. आणि या मागचे काडिसम्राट वेगळेच असतात.. अशा वेळी इतर लोकांचा सल्ला घेण्याअगोदर एकमेकांशी बोलण जरूरी असतं बहुतेक बहीण भावाच्या नात्यात इतरांनी केलेल्या हस्तक्षेपामुळेच वाद घडतात. प्रेमळ नाती इतरांच्या चुकीच्या सल्ल्यामुळे तुटतात..बहीण भावामध्ये केवळ प्रेमाचेच नाते असावे..ऐकमेकांना माफ करून नाते आयुष्यभर टिकवण्याचा प्रयत्न करावा. दोष असतील तर समजून सांगावे मजबूरी असेल तर समजुन घेऊन मार्ग काढावेत. परंतु जबाबदारी झटकुन हात वर करू नये, कठिण प्रसंगात जबाबदारी ओळखून मनोमन साथ द्यावी.
कोणीच हेकेखोर होऊ नये .आपल्या जीवनाला मर्यादा आहे परंतु नात्यांच्या जबाबदाऱ्या आपले कर्तृत्व आणि नात्यांची दृढता उंचावते त्यामुळे बहिण भावांचे पवित्र नाते जपण्याचा प्रयत्न असावा. लहानपणापासून एकाच घरात वाढलेले, त्याच पालकांच्या शिस्तीखाली, प्रेमाने वाढलेले भाऊ-बहीण अनेकदा फक्त संपत्तीच्या कारणामुळे दूर का जातात ?हा प्रश्न आपल्या समाजात बर्याच वेळा पडतो. संपत्तीचे कारण या दोघाचं नातंच संपवून टाकू शकेल इतकं प्रबळ का होते?
पैशाने, संपत्तीने मानसाची नियत बदलते, संपत्तीमुळे नाती तुटली तरी दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये प्रेम ही कमी झालेलं असतं असं नाही. बहूतांशवेळा भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयाचा नंतर पश्चाताप होत असल्याचं दिसून येतं.आज कोणालाही कमीपणा घेणे, माघार घेणे, दुसर्याचे मत समजून घेणे,हे अपमानास्पद वाटत आहे. त्यामुळे काहींच्या बाबतीत अशा पवित्र नात्यांमध्ये दुरावा येतो. गैरसमज होतो. द्वेष निर्माण होतो. पण आज आपण इथे अशी आशा करू की प्रत्येकाने ज्याला नाते टिकवायचे आहे त्याने समजुतदारपणे मन मोठे करून नाते टिकवावे. आणि प्रेमाने रहावे.. मग ते सख्या बहीण भावांचे असो किंवा मानलेल्या बहीण भावांचे असो…जपूया हे बंध रेशमाचे .भाऊ बहिणीचे !
समीक्षा चंद्रकांत चव्हाण
एम.ए -२, मराठी विभाग,छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा
तारळे,जिल्हा -सातारा