दैनिक स्थैर्य । दि. २२ जून २०२३ । मुंबई । दर्शना पवार हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला आहे. राजगडाच्या पायथ्याशी दर्शना पवारचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळलो होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. नंतर शवविच्छेदन अहवालातून तिचा खून झाला असल्याचे समोर आले होते. यानंतर दर्शनाचा मित्र राहूल हंडोरेला अंधेरी रेल्वे स्टेशनवरून अटक करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, लग्नाला नकार दिला म्हणून राहुलने दर्शनाचा खून केल्याचा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला. राहुल हंडोरेला अटक केल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी पत्रकार परिषद घेत दर्शना पवार हत्या प्रकरणाची माहिती दिली.
दर्शनाच्या हत्येनंतर तिच्या कुटुंबीयांनी राहुलला थेट फाशी देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. माझ्या मुलीचे जसे तुकडे केले तसे त्याचे करू द्या, माझ्या मुलीला मीच न्याय देऊ शकते, अशा शब्दांत तिच्या आईने संताप व्यक्त केला आहे. तसेच आरोपीला आमच्या ताब्यात द्या नाहीतर त्याला मारून टाका असं दर्शनाच्या भावाने म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना कुटुंबीयांनी असं म्हटलं आहे.
“माझ्या मुलीचे जसे तुकडे केले तसे मी त्याचे तुकडे करणार. मला माझ्या मुलीला न्याय द्यायचा आहे आणि तो मीच देऊ शकते. माझी मुलगी गेली आहे तशा इतरांच्या मुली जाऊ नये. यासाठी कठोर शिक्षा झालीच पाहिजे. त्याचे तुकडे मी एकटीच करणार. मला कोणी लागत नाही. जशी त्याने माझ्या मुलीची हत्या केली. तशी त्याची हत्या करणार. त्याला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे, तो राहिलाच नाही पाहिजे. त्याने फसवून तिला नेलं आणि तिचा घात केला” असं दर्शनाची आई सुनंदा पवार यांनी म्हटलं आहे.
“आमच्या ताब्यात द्या नाहीतर मारून टाका त्याला. त्याला जिवंत सोडता कामा नये. तो मेलाच पाहिजे. त्याच्यामुळे माझ्या बहिणीला खूप त्रास झाला आहे. त्यामुळे तुम्ही त्याला मारा नाहीतर आमच्याकडे द्या, अशी माझी सरकारला विनंती आहे” असं दर्शनाचा भाऊ अभिषेकने म्हटलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर ऊर्फ राहुल दत्तात्रय हंडोरे (वय 28 वर्षे, रा. हिंगणे होम कॉलनी, दत्तमंदीराजवळ, कर्वेनगर, पुणे, मुळ रा. मु.पो.शहा, ता. सिन्नर, जि. नाशिक) हा गुन्हयातील मुख्य संशयित असल्याचे व तो गुन्हा घडल्यापासून पळून गेला असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावरून तपास पथकांनी संशयित राहुल दत्तात्रय हांडोरे याचा शोध घेऊन अंधेरी रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतले.
राहुलने गुन्हा केल्याचे कबूल केला आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास ते गडाकडे निघाले होते. माघारी येताना (पावने अकरा) राहूल एकटाच आला होता. खून केल्यानंतर तो बंगालसह महाराष्ट्रत विविध ठिकाणी रेल्वेने फिरत होता. दर्शना आणि राहुल एकमेकांचे नातेवाईक नव्हते पण त्यांची ओळख लहापणापासून होती. दर्शनाच्या मामाचे घर आणि आरोपीचे घर समोरासमोर होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.