
दैनिक स्थैर्य । 28 मार्च 2025। फलटण । ज्यांचे 65 वर्षापेक्षा जास्त वय असणार्या वकीली व्यवसाय करणारे विधीज्ञ यांना प्रतिमहा कमीत कमी 10 हजार पेंशन सुरू करण्याची मागणी फलटण बार असोसिएशनचे अध्यक्ष बापूसाहेब सरक यांनी महाराष्ट्र शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चेअरमन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, आमदार सचिन पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, उपविभागीय अधिकारी फलटण यांना देण्यात आल्या.
निवेदनात असे म्हटले आहे की, राज्यामध्ये लोकहिताच्या अनेक योजना कार्यान्वित झालेल्या आहेत. वकील बांधव हे वर्षानुवर्षे महाराष्ट्रात वकीली व्यवसाय करत असतात. अनेक वकीलांना त्यांचे वयाच्या 65 वर्षानंतर अनेक आजारांना सामोरे जावे लागते.
तसेच इतर दैनंदिन जीवनांमध्ये आर्थिक मदतीची आवश्यकता भासत असते. यासाठी मुख्यमंत्र्यांनी वकीलांच्या हिताचा ठोस निर्णय घेऊन कमीत कमी 10 हजार पेंशन सुरू करावी.
यावेळी फलटण बार असोसिएशनचे अॅड. शारदा दीक्षित, अॅड. पूनम करपे, अॅड. प्रशांत निंबाळकर आदी विधिज्ञ उपस्थित होते.