दैनिक स्थैर्य | दि. ३ जून २०२३ | सातारा |
आगामी निवडणुकांच्या दृष्टीने बूथ कमिट्यांचे नव्याने सक्षमीकरण करण्याची गरज आहे. निवडणूक काळातील सर्व कामे गतीने होण्यासाठी १८ ते २५ वयोगटातील युवकांना संधी देण्यात यावी, अशी सूचना आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली तर निवडणुकीच्या तयारीचा बूथ कमिटी महत्त्वाचा पाया आहे. तो भक्कम करून आगामी निवडणुकांची तयारी करावी, अशा सूचना आ. शशिकांत शिंदे यांनी केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पश्चिम महाराष्ट्र बूथप्रमुख आ. शशिकांत शिंदे यांची नियुक्ती झाल्यानंतर सातारा येथील राष्ट्रवादी भवनात कार्यकर्ते व पदाधिकार्यांची बूथ सक्षमीकरण बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. खा. श्रीनिवास पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, सत्यजित पाटणकर, दीपक पवार, सुनील माने, सारंग पाटील, राजकुमार पाटील, शफिक शेख आदी उपस्थित होते.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले की, आ. महेश शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमुठीबाबत वक्तव्य केले आहे. येत्या काळात ते कोणत्या पक्षात असतील हा प्रश्नच आहे. तो आणि शिंदे यांचे भवितव्य काय असेल. भाजपाचेच काही नेते यांच्यासोबत आघाडी करून अडचणीत आल्याचे खासगीत सांगतात. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीची चिंता करण्यापेक्षा स्वत:ची काळजी करावी.
फुटलेल्या शिंदे गटाच्या आमदारांमध्ये हतबलता आहे. विधानसभेच्या अधिवेशनात विस्तार केल्यास नाराजी केल्याने नाराजी आहे. निधी वाटपात एकवाक्यता नसल्यामुळे नाराजीचा सूर सहा महिन्यात असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात लोकसभेच्या त्यांना दहा जागाही निवडून आणता येणार नाही, सातारा आणि माढाही जिंकू, असा आत्मविश्वास आ. शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या खंडाळा तालुका उपप्रमुख वैशाली नेवसे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.