स्थैर्य, मुंबई, दि.६: अतिवृष्टी आणि बोंडअळीमुळे कापूस-सोयाबीनचे प्रचंड नुकसान झालेले असतानासुद्धा विदर्भातील शेतक-यांना कुठलीही मदत मिळाली नाही. अशात शेतमाल खरेदीसुद्धा अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे अन्य अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा राज्य सरकारने शेतक-यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले की, बोंडअळी, बोंडसडीमुळे यंदा विदर्भात कापसाचे मोठे नुकसान झालेले आहे. आताच्या अनुमानानुसार ५० टक्क्यांच्या वर हे नुकसान असून, ते आणखी वाढत जाणार आहे. बोंडअळीने कापूस नष्ट झाला. बोंडसडीत वरून बोंड चांगले दिसत असले तरी ते फोडताच कापूस सडलेला असतो.
अतिवृष्टीने सोयाबीनचे सुद्धा प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीनचे नुकसान जवळजवळ 80 टक्क्यांच्या आसपास आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात ही स्थिती आहे. इतकी गंभीर स्थिती असतानाही कुठेही सरकारच्या वतीने प्रशासनाला कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत, असा मुद्दा फडणवीसांनी पत्रात मांडला.
ते पुढे म्हणाले की, स्थानिक प्रशासन पंचनामे करीत असले तरी त्याचा कोणता फायदा होईल, अशी स्थिती जाचक अटींमुळे नाही. अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्यासंदर्भात जो शासन आदेश काढण्यात आला, त्यात विविध निकष ठेवल्याने विदर्भातील बहुतांश शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. दुसरीकडे शेतमालाची खरेदी अजून प्रारंभ झालेली नाही. ओलसर कापसाला खाजगी व्यापारी भाव देत नाही, त्यामुळे शेतक-याची पिळवणूक होते आहे. सोयाबीन सुद्धा ओला असल्याने 3000 रूपयांपेक्षा कमीच भाव मिळत आहे. त्यामुळे खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी भरडला जातो आहे. सुमारे 8 लाख हेक्टरहून अधिक नुकसान असताना प्रत्यक्षात शासनाच्या नाकर्तेपणामुळे शेतक-यांना कोणतीही मदत मिळणार नाही, अशी स्थिती आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत बाजार समित्यांमध्ये सुद्धा 50 टक्केच शेतमालाची आवक होत असल्याची स्थिती असल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे, हे स्पष्टच आहे.