दैनिक स्थैर्य । दि.११ मे २०२२ । सातारा । कोरोना काळात एकल झालेल्या महिलांच्या तक्रारीचा पाठपुरावा करुन त्यांच्या अडचणींचा निपटारा करुन त्यांना लवकरात लवकर सानुग्रह अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ‘एक विशेष समिती सातारा जिल्ह्यासाठी ‘स्वयंसिद्धा’ या नावाने स्थापन करावी. या विषयात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहभागातून या प्रकारच्या प्रकरणांचा नियमित आढावा घेण्यात यावा. या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
सातारा येथे शासकीय विश्राम गृहात एकल महिलांसोबत आयोजित केलेल्या बैठकीत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, विजय ढेपे, बालसंरक्षण अधिकारी सुजाता देशमुख, स्त्री आधार केंद्राच्या जेहलम जोशी, निर्माण सामाजिक संस्थेच्या प्राची नवगिरे, एकल महिला समितीच्या प्रा. कविता म्हेत्रे आदी उपस्थित होते.
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाग्रस्त आणि शेतकरी कुटुंबातील एकल महिलांसाठी समाधान शिबिरे, मालमत्ता नावावर करण्यासाठी विशेष मोहीम, तालुकानिहाय शिबिरे घेण्यात येत आहेत. या माध्यमातून महिलांची नावे त्यांच्या जमिनी आणि मालमत्तामध्ये सातबारावर नोंद करता येणे सहज शक्य आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, शेतकरी एकल महिलांना तीन एकरापर्यंत मोफत बी- बियाणे, खते देण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या महिलांना लाभ मिळाला नाही, त्यांची यादी तयार करुन प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात होणाऱ्या लोकशाही दिनाच्या निमित्ताने या यादीचा पाठपुरावा करावा. महामंडळाच्या मार्फत अशा एकल महिलांना कर्ज सुविधा उपलब्ध करण्यात येतील, याकरिता एकल महिलांची यादी व त्यांना कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी आहेत, याची सविस्तर तालुकानिहाय यादी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तयार करावी. ज्या एकल महिलांच्या कुटुंबात वय वर्षे 16 ते 18 या वयोगटातील मुले असतील त्या कुटुंबांना प्रथम प्राधान्याने सवलतींचा लाभ देण्यात यावा. तसेच कोविडने मृत्यु पावलेल्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान न मिळालेल्या तसेच एकल महिला, शेतकरी महिला, बांगडी व्यवसाय, फिरून कपडे, भाजी, भांडी विकणाऱ्या महिला, छोटे व्यवसाय करणाऱ्या महिलांनी श्रमिक पोर्टलवर आपल्या व्यवसायाची नोंद करावी. यासाठी तालुकास्तरावर तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा.