एका गावाला एक प्रशासक द्या,नाहीतर सरपंचांना सन्मानाने नियुक्त करा-जितेंद्र भोसले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


सरपंच काढणार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

स्थैर्य, कोरेगाव, दि. २८ : राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरपंच यांना मुदत वाढ मिळालीचं पाहिजे. एक शासकीय अधिकाऱ्याकडे मुळ कामाबरोबरच ४ ते ५ ग्रामपंचायतीच्या प्रशासक म्हणून जबाबदारी दिली असून हे अयोग्य आहे.एकाच ग्रामपंचायतीची शासकीय अधिकाऱ्याकडे जबाबदारी द्या, नाही तर कोरोनाच्या विरोधात योगदान देणाऱ्या सरपंचांना प्रशासक म्हणून सन्मानाने नियुक्त करा,या मागणीसाठी जिल्ह्यातील सरपंच परिषद एकवटली असून लवकरच शासनाविरोधात धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष आणि नागझरीचे सरपंच जितेंद्र भोसले यांनी पत्रकारांशी शी बोलताना सांगितले.

राज्यातील निवडणूकांना स्थगिती दिल्याने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती कोणाची करायची यावरून राज्यात चांगलेच शब्द युध्दापासून उच्च न्यायालयात घमासान सुरू आहे. शासनाने मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पालकमंत्री यांनी समन्वयातून योग्य व्यक्तीची निवड करून त्यांची प्रशासक म्हणून निवड करावी, असा निर्णय घेऊन त्यासाठी राजपत्र हि काढले. तर याविरोधात अनेक संघटना, कार्यकर्त्यांनी थेट न्यायालयात याचिका दाखल करून शासन निर्णयाला आव्हान दिले. याबाबतीत उच्च न्यायालयात शासकीय व्यक्ती प्रशासक म्हणून नियुक्त करावेत, असा प्रथम निर्णय दिला असून त्यावर दि.२४ आँगस्ट रोजी युक्तिवाद होऊन ही अंतिम निर्णय झाला नाही. पुढील सुनावणी दि.७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रत्येक गावातील सरपंचांनी बहुमोल योगदान दिले आहे.त्यांनाच प्रशासक पदावर नियुक्त करून हाच लोकशाहीचा विजय असेल, असे सरपंच परिषदेचे सातारा तालुका अध्यक्ष अँड. अनिल सोनमळे यांनी सांगितले.

सध्या शासकीय अधिकाऱ्यांची ४ ते ५ ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुव जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडण्याबरोबर एवढ्या गावांच्या प्रशासक पदाची जबाबदारी पार पाडण्यासाठी न्याय देऊ शकणार नाहीत, उलट फक्त सह्या बहाद्दर राहतील, हि लोकशाहीची चेष्टा होईल.प्रशासक म्हणून नियुक्त करण्यासाठी तेवढे अधिकारी नसताना हा आटापिटा कशासाठी असा सवाल जिल्हा महिला अध्यक्षा मंदाकिनी सावंत यांनी केला आहे.

तर आधीचा अनुभव आणि कोरोना योध्दा असलेल्या सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करावे. यासह १४ वा वित्त आयोगाच्या व्याजाची रक्कम, संगणक आँपरेटर मानधनासह काही महत्त्वाच्या मागण्यांसाठी सरपंच परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी क्रांतिकारकांच्या जिल्ह्यात भव्य क्रांती मोर्चा काढण्यात येणार असल्याचे माहिती आदर्श सरपंच आणि कराड तालुका अध्यक्ष शंकर बापू खापे यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!