स्थैर्य, वाठार स्टेशन, दि.०७: सातारा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या वाठार स्टेशन मध्ये गेले कित्येक वर्ष संपूर्ण महाराष्ट्राला नवसंजीवनी देणार्या १०८ या रुग्णवाहिकेची वेळोवेळी मागणी करून सुद्धा जाणूनबुजून हा विषय डावलला जात आहे विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रात १०८ या रुग्णवाहिकेचे काम हे उत्कृष्ट समजले जाते याच्याच अनुषंगाने निवेदनाद्वारे तसेच संपर्काद्वारे मागणी करून सुद्धा १०८ ही रुग्णवाहिका दिली जात नाही. कोरोना सारख्या आपत्तीमध्ये ६० गावांचा मध्यबिंदू असणाऱ्या वाठार स्टेशनला एकही रुग्णवाहिका नसणे म्हणजे मोठी खेदाची गोष्ट म्हणावी लगेल. गेल्या वर्षी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका जाळल्याने तर येथील परिसरातील रुग्णांचे मोठे हाल पहावयास मिळत आहेत.
याच पार्श्वभूमीवर वाठार स्टेशन येथील शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपजिल्हाप्रमुख मा.विशाल जाधव व माजी सरपंच ऋषी जाधव हे उपोषणाच्या पवित्र्यात असलेले दिसत आहेत याबद्दल त्यांनी समाजमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देखील कळविली आहे. वाठार स्टेशनला रुग्णवाहिका असणे ही फार मोठी गोष्ट आहे तसे पाहिले तर वाठार स्टेशनमधून राज्य महामार्ग जातो त्यामुळे येथे सतत छोटे मोठे अपघात घडत असतात व आजूबाजूला मोठया प्रमाणावर ग्रामीण भाग असल्याने सतत काहींना काही घटना घडत असतात. गेले कित्येक वर्षे संबंधित अधिकारी यांना पत्र व्यवहार करून सुद्धा हे अधिकारी झोपेचे सोंग घेताना दिसत आहेत याच अनुषंगाने विशाल जाधव व ऋषी जाधव ही जोडी पुनः एकदा ऍक्शन मोडमध्ये पहावयास मिळणार आहे. आज पर्यंत या जोडीने केलेली आंदोलने, मोर्चे फेल गेलेली नाहीत त्यामुळे वाठार स्टेशनला लवकरच १०८ ही रुग्णवाहिका मिळणार याबाबत दुमत नाही. वाठार स्टेशन येथे १०८ ही रुग्णवाहिका मिळाल्यानंतर ग्रामीण भागातील जनतेची होत असलेली फरफट थांबणार आहे.