ओमायक्रॉनचा धोका पाहता जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण करा – जिल्हाधिकारी शेखर सिंह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२१ । सातारा । कोविड विषाणूच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा   धोका पाहता जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण करा. यासाठी गावनिहाय यादी तयार करुन प्रत्येक घराचे सर्व्हेक्षण करा. यामध्ये लोकप्रतिनिधींचाही सहभाग घ्या. तसेच ज्या नागरिकांचा लसीकरणाचा पहिला डोस झाला आहे, परंतु दुसरा डोस घेतला नाही अशा नागरिकांना डोस घेण्यासाठी प्रवृत्त करा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या.

कोविड विषाणूच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा भविष्यात प्रार्दुभावासंदर्भात करावयाच्या उपाययोजनेबाबत जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. या बैठकीला पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अपर पोलीस अधीक्षक अजय बोऱ्हाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील आदी उपस्थित होते.

नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोविड विषयी असलेल्या मार्गदर्शन आदेशाचे पालन करावे, असे सांगून जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, कोविडसाठी उभारण्यात आलेल्या सर्व आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवाव्यात.   विविध शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लँट लावले आहेत. ते व्यवस्थीत आहेत का याची तपासणी करावी. तसेच  ऑक्सिजन प्लँटला जोडण्यात आलेल्या पाईपलाईनचीही तपासणी करा.

ओमायक्रॉन धोका पाहता गावपातळीवर   ग्राम दक्षता समित्या कार्यान्वीत करा. 29 नोव्हेंबर 2021 रोजी काढण्यात आलेल्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करा. या आदेशाची माहिती देण्यासाठी विविध आस्थापनांची बैठक घ्या.  सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रशासनाला दिल्या.


Back to top button
Don`t copy text!