
स्थैर्य, गिरवी, दि. ३० ऑक्टोबर : आपल्या वडिलांच्या मृत्यू दाखल्यामध्ये ग्रामविकास अधिकाऱ्याने बेकायदेशीरपणे फेरफार (खाडाखोड) केल्याचा आरोप करत, गिरवी येथील रहिवासी गणपत लक्ष्मण कदम यांनी (दि. ३१) ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. हा दाखला तात्काळ दुरुस्त करून मिळावा, या मागणीसाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
गणपत कदम यांनी गिरवी येथील फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत लेखी अर्ज दिला आहे. अर्जानुसार, त्यांचे वडील लक्ष्मण नाना कदम यांचे निधन झाले होते. त्यांचा मृत्यू दाखला सुद्धा घेतला होता. मात्र, ते पुन्हा दाखला घेण्यासाठी गेले असता, मूळ मृत्यू नोंद रजिस्टरमध्ये नावावर खाडाखोड करून बेकायदेशीर व नियमबाह्य बदल केल्याचे निदर्शनास आले.
ही बेकायदेशीर खाडाखोड रद्द करून, आपल्या वडिलांचा मृत्यू दाखला ‘लक्ष्मण नाना कदम’ याच नावाने ऑनलाइन व ऑफलाइन स्वरूपात तात्काळ मिळावा, अशी मागणी कदम यांनी केली आहे. तसेच, या फेरफारास जबाबदार असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा ३१ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू करू, असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
 
					 
					 
					 
					
 
					 
					 
					 
					 
					