
स्थैर्य, फलटण, दि. ०६ ऑगस्ट : फलटण शहरातील गिरवी नाका परिसरात आज सायंकाळी झालेल्या घटनेत गोळीबार झाल्याच्या वृत्ताला फलटण शहर पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. या घटनेबाबत कोणताही पुष्टीदायक पुरावा किंवा साक्षीदार मिळाला नसून, एका संशयित इसमास ताब्यात घेण्यात आल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी दिली आहे.
आज सायंकाळी गिरवी नाका येथे एका संशयिताला पकडताना झालेल्या झटापटीमुळे परिसरात खळबळ उडाली होती. यावेळी गोळीबार झाल्याची चर्चा घटनास्थळी होती. मात्र, पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला आहे. पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून, त्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे.
याप्रकरणी कायदेशीर कारवाई पूर्ण झाल्यानंतर सविस्तर माहिती प्रसिद्धीसाठी दिली जाईल, असे पोलीस निरीक्षक शहा यांनी स्पष्ट केले आहे.
पोलिसांच्या या खुलाशामुळे गोळीबाराच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.