दैनिक स्थैर्य । दि.०३ जानेवारी २०२२ । फलटण । शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी गेल्या काही वर्षांपासून लढणाऱ्या आणि शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे परावर्तित करुन त्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पाडेगावचे सुपुत्र गिरीश बनकर यांची महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
टेंभुर्णी, जि. सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे महाराष्ट्र ऊस भूषण कार्य गौरव पुरस्कार वितरण सोहळा दै. सकाळ सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला, अध्यक्षस्थानी अतुलनाना माने पाटील होते. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील ऊस पिकात नवनवीन प्रयोग करुन अधिक उत्पन्न घेणाऱ्या निवडक ३० प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र शासन ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य शिवाजी पाटील, बाळासाहेब पटारे, महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष, जलतज्ञ अनिल पाटील, महाराष्ट्र शासन ऊस नियोजन समिती सदस्य विकासराव चव्हाण, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे वरिष्ठ ऊस संशोधक सुरेश उबाळ, जैन इरिगेशन स्टेट हेड शामकांत पाटील, महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शंभू सेना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष किरण चव्हाण, संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन जगताप आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.