दैनिक स्थैर्य | दि. १५ जुलै २०२४ | फलटण |
‘विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास’ हाच आमचा ध्यास या विचाराने प्रेरित होऊन ग्रामीण भागातील रयत शिक्षण संस्थेचे, श्री जितोबा विद्यालय जिंती या विद्यालयात अनेक उपक्रम राबविले जातात. त्यामुळे या विद्यालयातील अनेक विद्यार्थी वेगवेगळया क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ या उक्तीप्रमाणे माजी विद्यार्थी चार्टर्ड अकाऊंटंट जितेंद्र आगवणे (चेंबूर, मुंबई) यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना लेखन, वाचनाची गोडी निर्माण व्हावी, वाचनसंस्कृती वाढीस लागावी तसेच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून उत्तम दर्जाची मराठी भाषेतील बावीस व इंग्रजी भाषेतील नऊ अशी ३१ वाचनीय व संस्कारक्षम पुस्तके विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक ताराचंद्र आवळे यांच्याकडे सुपूर्द केली.
यावेळी जितेंद्र आगवणे म्हणाले की, इथून पुढे विद्यार्थ्यांना लागेल ती मदत करायला तयार आहे. गरीब, होतकरू व हुशार विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांना सर्व प्रकारची मदत करायची आहे. मी शिक्षण घेत असताना ज्या अडचणी आल्या, त्या अशा हुशार विद्यार्थ्यांना येऊ नये व त्यांचे शिक्षण थांबू नये या उदात्त हेतूने मला मदत करायची आहे.
प्रभारी मुख्याध्यापक ताराचंद्र आवळे म्हणाले की, माजी विद्यार्थी हे शाळेचे वैभव असतात. त्यांनी आपला नावलौकिक वाढविला की पर्यायाने गावाचा व तो विद्यार्थी ज्या शाळेत शिकला त्या शाळेचा नावलौकिक वाढतो. माजी विद्यार्थी आपल्या जुन्या शाळेला आईच्या रूपात पाहतात व ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात. ज्या शाळेने घडवले ती शाळा म्हणजे दुसरे घरच असते. त्यामुळे माजी विद्यार्थ्यांनी ज्या शाळेने संस्कार दिले त्या शाळेला भेट देऊन मदतीचा हात पुढे करावा व ज्ञानाच्या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलला पाहिजे.
जितेंद्र आगवणे यांनी पुस्तके भेट दिल्याबद्दल आवळे यांनी समाधान व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त केली. विद्यालयाला भेट देऊन पुस्तके भेट दिल्याबद्दल माजी विद्यार्थी जितेंद्र आगवणे यांचा शाळेची माहिती पुस्तिका व श्रीफळ देऊन ताराचंद्र आवळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी लेखनिक खिलारी जी. बी., गजानन धर्माधिकारी, सिंधू आगवणे, सौ. रोहिणी आगवणे तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ यांची प्रमुख उपस्थिती होती.