
स्थैर्य, फलटण, दि. ०९ डिसेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत दाखल होणाऱ्या कार्यकर्त्यांचा ओघ वाढत असताना प्रभाग क्रमांक ८ मधील उमेश घोलप आणि प्रभाग क्रमांक ४ मधील विक्रम पवार यांनी राजे गटाला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला. माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वात हा प्रवेश सोहळा पार पडला.
या वेळी भाजप नेते व नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, माजी नगरसेवक अनुप शहा, अजय माळवे, फिरोज आतार, सनी मांढरे यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही प्रभागांतील सक्रिय कार्यकर्ते असलेल्या घोलप आणि पवार यांच्या प्रवेशामुळे भाजपची संघटनशक्ती अधिक बळकट झाल्याचे पक्ष कार्यकर्त्यांनी सांगितले.
नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या दुहेरी गळतीमुळे राजे गटाला धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
