दैनिक स्थैर्य । दि. १२ नोव्हेंबर २०२२ । फलटण । गुणवरे, ता. फलटण येथील प्रगतिशील शेतकरी आणि सेवानिवृत्त मुख्य अभियंता (शुगर टेक्नॉलॉजी एक्स्पर्ट) यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्या जन्मगावी गुणवरे येथे निघालेल्या त्यांच्या अंत्य यात्रेत गावकरी, सामाजिक, सहकारी, आप्तेष्ट, मित्रमंडळी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ व मान्यवर लोक मोठ्या संख्येने हजर होते.
घनश्याम अनंत नाळे हे ग्रामीण भागातील अत्यंत साध्या शेतकरी कुटुंबात जन्माला आले होते. अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी आपले मेकॅनिकल इंजिनियरिंग चे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर सहकार क्षेत्रातील साखर कारखान्यामध्ये आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मुख्य अभियंता या उच्च पदापर्यंत पोचले.
त्यांनी यशवंत सहकारी अकलूज, शंकर सहकारी सदाशिवनगर, सिद्धेश्वर सहकारी सोलापूर, विठ्ठल सहकारी पंढरपूर, विघ्नहर सहकारी, जुन्नर, श्रीराम सहकारी, फलटण, सोमेश्वर सहकारी, सोमेश्वर नगर, आणि शेवटी सासवड माळी शुगर, माळीनगर असा यशस्वीरीत्या प्रवास केला. त्यांनी अति परिश्रमाने, जिद्दीने, चिकाटीने, आर्थिक काटकसर करून साखर कारखाने चालवले त्याबद्दल कारखाना व्यवस्थापनाने त्यांच्या कामाचा वेळोवेळी गौरव ही केला होता.
याशिवाय त्यांनी आपल्या राहत्या गुणवरे गावी स्वतःची शेती पण चांगल्या प्रकारे विकसित करून एक प्रगतिशील बागायतदार अशी प्रतिमा स्वकर्तुत्वाने आणि कष्टाने निर्माण केली होती. सर्व क्षेत्रातून त्यांच्या अशा अचानक जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.