सत्ताधारी व विरोधक गट “घडसोली” मैदानावरून आमनेसामने

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०३ जानेवारी २०२५ | फलटण | फलटण शहरातील घडसोली मैदानावरून गुरुवार, २ जानेवारी २०२५ रोजी सत्ताधारी व विरोधक गट आमनेसामने आले. विद्यमान आमदार सचिन पाटील व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी घडसोली मैदानाची पाहणी केली, ज्यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे उपस्थित होते.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की फलटण शहरामध्ये एवढे मोठे असणारे एकमेव मैदान आहे. या मैदानाचा फलटण एज्युकेशन सोसायटीच्या सोबत असलेला भाडे करार सन २००२ साली १५ वर्षांचा करण्यात आला होता, जो संपलेला आहे आणि त्याचे नूतनीकरण झाले नाही.

सत्ताधारी गटाकडून आमदार सचिन पाटील म्हणाले की फलटण शहरामध्ये एक भव्य – दिव्य स्टेडियम व्हावे अशी इच्छा सर्वच फलटणकरांची आहे. नवीन वर्षांमध्ये फलटणकर नागरिकांचे स्टेडियमचे स्वप्न सुद्धा पूर्णत्वास जाणार आहे. त्यासाठी घडसोली मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून लवकरात लवकर भरघोस असा निधी मंजूर करून आणणार आहे.

फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष म्हणाले की, घडसोली मैदानाबाबतचा भाडे करार आम्ही नूतन केला असून सन २०४७ पर्यंतचा भाडे पट्टा सुद्धा आम्ही शासनाकडे विहित चलनाच्या माध्यमातून जमा केला आहे. माजी खासदार व विद्यमान आमदार हे प्रसिद्धीसाठी स्टंट करत असून घडसोली मैदानात आता सुद्धा विविध खेळ खेळले जात आहेत. खेळाच्या शिवाय इतर कोणत्याही कारणासाठी घडसोली मैदानाचा वापर करण्यात येत नाही. जर माजी खासदार व विद्यमान आमदारांना क्रीडा संकुल करायचे असेल तर जाधववाडी येथे असणारे तालुका क्रीडा संकुलाची जागा प्रचंड मोठी आहे. त्या ठिकाणी नक्कीच चांगल्या दर्जाचे क्रीडा संकुल होऊ शकते. यामध्ये विनाकारण राजकारण आणून प्रसिद्धीचा स्टंट माजी खासदार व विद्यमान आमदार करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!