दैनिक स्थैर्य । दि. २३ नोव्हेंबर २०२२ । फलटण । घडशी समाज सेवा संस्था संचलित, अखिल महाराष्ट्र घडशी समाज संघाच्यावतीने करण्यात आलेल्या मागण्या रास्त असून त्यांच्या सोडवणूकीसाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन देत आपण सर्वांनी संघटीत होऊन एकविचाराने सुरु केलेला प्रयत्न निश्चित यशस्वी होईल असा विश्वास श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर सरस्वती मातेच्या प्रतिमेची मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात आली, मिरवणूक मार्गावर असलेल्या छ. शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. फुले, श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर प. पू. उपळेकर महाराज मंदिर सभागृहात आयोजित सभेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक रविंद्र धुमाळ सर, सोमनाथ पवार, अनिल पवार यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख मंडळी आणि फलटण शहर व तालुक्यातील समाजातील स्त्री – पुरुष बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी रविंद्र धुमाळ सर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात समाजाच्या विविध मागण्या समोर ठेवून त्यांच्या सोडवणुकीसाठी सहकार्य व मार्गदर्शन करण्याची विनंती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना केली. घडशी समाजासाठी शासनाकडून भूमीहिनांना जागा मिळाव्यात, या समाजातील कलाकारांना परंपरागत कला सादर करण्यासाठी संगीत विद्यालय उभारण्यासाठी शासकीय जागा आणि निधी उपलब्ध व्हावा, प्रमुख्याने कलाकार महामंडळाची स्थापना व्हावी त्या माध्यमातून समाजातील महिला व तरुणांसाठी लघु उद्योग आणि बचत गट सुरु करण्यासाठी मार्गदर्शन व अर्थसहाय्य उपलब्ध करुन द्यावे वगैरे प्रमुख मागण्यासह समाजातील अडचणीच्या विविध विषयांबाबत मागण्या करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ज्येष्ठ मार्गदर्शक सोमनाथ पवार सर यांनी, समारोप व आभार राज्याध्यक्ष अनिल शंकर पवार यांनी केले. सदर कार्यक्रम पार पाडणेसाठी फलटण, धुळदेव येथील तरुण कार्य कर्ते यांनी परिश्रम घेतले.