ग्रामीण रुग्णालयात उपचार घ्यावेत – पालकमंत्री बच्चू कडू यांचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, अकोला, दि. १५: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामुळे शासकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील कोविड उपचार सुविधांवर अतिरिक्त भार पडतो आहे. तथापि, जिल्हा प्रशासनाने पालकमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करून कोविड उपचारांसाठी ग्रामीण भागात ३१३ ऑक्सिजन बेड व सहा ऑक्सीजन प्लांट निर्मितीसह अन्य उपचार सुविधा निर्माण केल्या आहेत. तरी ग्रामीण भागातील कोविड रुग्णांनी स्थानिक रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले आहे.

काल झालेल्या कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना आढावा बैठकीत ग्रामीण रुग्णालयात आवश्यक सोईसुविधा, वैद्यकीय अधिकारी व नर्सिंग स्टाफ उपलब्ध करुन त्या त्या भागातील रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात उपचार सुविधा निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार अकोट येथे 20 ऑक्सीजन बेड, तेल्हारा येथे 20, बार्शीटाकळी येथे 20, बाळापूर येथे 20, मुर्तिजापूर येथे 48, जिल्हा स्त्री रुग्णालय येथे 50, जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे 35, तर पंजाबराव देशमुख विद्यापीठ येथील जॅम्बो हॉस्पीटल येथे 100 असे एकूण 313 ऑक्सीजन बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. तर ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी, बाळापूर, अकोट व तेल्हारा येथे प्रत्येकी एक तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे दोन असे सहा ऑक्सीजन प्लांट निर्मिती होणार आहे. तसेच नॉन ऑक्सीजन बेड तयार करण्याचे कार्यादेश दिले असून या सुविधाही येत्या 15 दिवसात कोरोना रुग्णांच्या उपचाराकरिता उपलब्ध होतील. त्यामध्ये अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी व बाळापूर येथे प्रत्येकी 10, तर मूर्तिजापूर येथे 50, जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे 15 असे एकूण 105 नॉन ऑक्सीजन बेड उपलब्ध होणार आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथे 50 व खेडकर महिला वसतिगृह तेल्हारा येथे 50 बेडची व्यवस्था प्रस्तावित असून ती ही व्यवस्था येत्या 15 दिवसात पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण यांनी दिली आहे.

दिलेल्या निर्देशानुसार उपलब्ध होत असलेल्या उपचार सुविधा, ऑक्सिजन बेड याबाबत पालकमंत्री ना.कडू यांनी समाधान व्यक्त केले असून ग्रामीण भागातील लोकांना शहराच्या ठिकाणी येऊन उपचार घेण्याऐवजी आपल्या नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार मिळतील. लोकांनी जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावे,असे आवाहन ही त्यांनी केले आहे. जादा उपचाराची आवश्यकता भासल्यास त्यांना नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवता येईल, असेही त्यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!