स्थैर्य, दौलतनगर दि.17 : पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये सन २०१९ या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत नियमीतचे ०५ व संशोधन विकास कार्यक्रमातंर्गत ०५ असे एकूण १० रस्त्यांची कामे मंजुर करुन आणली आहेत. या कामांना आवश्यक असणारा निधीही शासनाने दिला आहे. या कामांना विलंब का लागला? या १० कामांना तात्काळ गती देवून ही कामे लवकरात लवकर मार्गी लावा अशा सक्त सुचना राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंचे अध्यक्षतेखाली पाटण विधानसभा मतदार संघामधील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत सन २०१९ मध्ये नियमीत व संशोधन विकास कार्यक्रमातंर्गत ना. शंभूराज देसाईंनी आमदार असताना मंजुर केलेल्या कामांच्या सद्यपरिस्थिती संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीस मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता एस. पी. खलाटे, उपअभियंता व्ही. बी. पानस्कर, शाखा अभियंता एस. एन. म्हासेरे, व्ही. बी. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी ना. शंभूराज देसाईंनी बैठकीत पाटण मतदारसंघातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत सन २०१९ मधील मंजुर कामांच्या सद्यपरिस्थितीचा आढावा घेवून वरीलप्रमाणे सुचना केल्या. ना. शंभूराज देसाईंनी सन २०१४ ते २०१९ या पाच वर्षाच्या कालावधीत आमदार असताना पाटण मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत एकूण ५० मोठया रस्त्यांची कामे मंजुर करुन आणली आहेत त्याची एकूण लांबी १३२.८१० किलोमीटर इतकी असून प्रारंभी त्यांनी या ५० रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. यामध्ये एकूण २० रस्त्यांची कामे मार्गी लागली असून २० रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात असून १० कामे अद्यापही स़ुरु करण्यात आली नाहीत ती कामे लवकरच सुरु करण्याचे नियोजन विभागाने केले असल्याची माहिती अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली. दरम्यान मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत सन २०१९ मध्ये मंजुर असणाऱ्या परंतू अद्याप सुरु नसलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील नियमितमध्ये मंजुर नाडोली गावपोहोच, दिवशी ते मारुलहवेली, नावडी गावपोहोच, मणदुरे फाटा ते निवकणे, वर्पेवाडी गोकुळ गावपोहोच रस्ता तसेच संशोधन विकास कार्यक्रमातंर्गत नुने गावपोहोच, पाळेकरवाडी गावपोहोच, खिवशी गावपोहोच, तोरणे गावपोहोच व भारसाखळे जौरातवाडी या एकूण १० रस्त्यांच्या कामांचा त्यांनी अधिकाऱ्यांकडून रस्तानिहाय आढावा घेतला व या कामांना आवश्यक असणारा निधी शासनाने संबधित यंत्रणेकडे दिला असल्याचे सांगत या १० ही रस्त्यांची मोठया प्रमाणात दुरावस्था झाली आहे ही प्रमुख गांवे असून या गांवाना जोडणारे रस्ते तातडीने पुर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे आता विलंब न करता तात्काळ या कामांना गती देवून ही कामे लवकरात लवकर कशी पुर्ण होतील याकडे विभागाने प्राधान्य दयावे व ही कामे मुदतीत पुर्ण करुन घ्यावीत अशा सुचना त्यांनी बैठकीत दिल्या.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा यंदाच्या वर्षीचा आराखडा लवकर सादर कराप्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत भाग ३ मध्ये यंदाच्या वर्षी करावयाच्या रस्त्यांच्या संदर्भात ऑक्टोंबर २०१९ मध्ये केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सुचना निर्गमीत करण्यात आल्या आहेत. मार्गदर्शक सुचनानुसार नियमात बसणाऱ्या कोणकोणत्या ग्रामीण रस्त्यांना प्राधान्य देता येईल, कोणते संभाव्य रस्ते करता येतील यांचा आराखडा तयार करुन तो लवकरात लवकर मंजुरीकरीता सादर करा असेही ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत अधिकाऱ्यांना सांगितले.