स्थैर्य, फलटण, दि.२२: जगात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत आरोग्य तज्ज्ञांकडून दिले गेले आहेत. तिसरी लाट लहान मुलांना हानिकारक असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी करत आहे. सातारा जिल्ह्यात विशेषत: फलटण तालुक्यातील आरोग्य यंत्रणेने संभाव्य तिसर्या लाटेचा धोका लक्षात घेता तयारी करणे गरजेचे आहे. प्रशासनाने व जनतेनेही तिसर्या लाटेसाठी सज्ज होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात असणार्या फलटण नगरपरिषदेच्या राजधानी टॉवर्सची व माळजाई मंदिरासमोरील इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनची पाहणी आज मंगळवार (दि. 22) रोजी सकाळी साडेदहा वाजता श्रीमंत संजीवराजे यांनी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने, युवा नेते राहूल निंबाळकर, माजी नगरसेवक अनिल शिरतोडे, उपविभागीय अधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप, तहसिलदार समीर यादव, मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
दरम्यान, संभाव्य तिसर्या लाटेची तयारी करत असताना प्रशासनाने कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा करु नये. तसेच रुग्णांना सर्वसोयींयुक्त कोरोना केअर सेंटर उभा करण्यात कुचराई करु नये. फलटण तालुक्यात ठिकठिकाणी आपण विविध संस्था व लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून कोरोना केअर सेंटर उभा केलेली आहेत. शहरातही कोरोना केअर सेंटर उभी आहेत. मात्र, कोरोनाची संभाव्य वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेवून आपण तयारी करणे गरजेचे आहे, असे मत श्रीमंत संजीवराजे यांनी व्यक्त केले.
त्याचबरोबर शहरातील व तालुक्यातील जनतेने घराबाहेर संचार करत असताना जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या आचारसंहितांचे पालन करुनच संचार करणे गरजेचे आहे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करुन सुरक्षित अंतरावरुनच एकमेकांशी संपर्क साधणे या काळात उचित ठरेल, असे श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले.