दैनिक स्थैर्य । दि. १२ नोव्हेंबर २०२२ । फलटण । फलटणमधील मोरया हॅास्पिटलचे सुप्रसिद्ध कान नाक घसा तज्ञ डॅा जनार्दन पिसाळ यांनी कुत्रा चावल्यावर होणाऱ्या रेबीज या आजाराचे बरोबर निदान केल्यावर त्यांना या आजाराबद्दल माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की –
रविवारी ओपीडी मध्ये एक दुर्मिळ केस बघण्यात आली… एक १३ वर्षाचा मुलगा, ज्याला घशामध्ये गिळायला त्रास होत आहे म्हणून फलटणमधील बालरोगतज्ञ डॉक्टरांनी घशाच्या तपासणीसाठी माझ्याकडे पाठविला होता. पेशंट तपासताना त्याच्या आई वडिलांनी सांगितले की तो शनिवार पासून काही खाऊ -पिऊ शकत नाहीये. तोंड वेडेवाकडे करत आहे . अगदी पाणी सुद्धा पिऊ शकत नाहीये…त्याला बघून मला त्याच्या चेहऱ्याच्या व जबड्याच्या हालचाली विचित्र वाटल्या आणि एक वेगळीच शंका वाटली…ती म्हणजे अतिशय अशा दुर्मिळ असणाऱ्या रेबीज आजाराची ., म्हणून मी त्याला कधी कुत्रा तर चावला नाही ना अशी विचारणा केली…आणि दुर्दैवाने माझी अटकळ खरी निघाली त्याच्या आईने जरा आठवुन सांगितले की, त्याला ६ महिन्यांपूर्वी त्यांचा पाळीव कुत्रा चावला होता. त्याच्या पायाच्या घोट्यावर कुत्रा चावल्याचा मोठा व्रण होता तो मला त्यांनी दाखवला. पण तो कुत्रा अजूनही चागला जिवंत आहे, असे पालकांचे म्हणणे आले.. नंतर आई ने अजून एक अज्ञात कुत्रा त्याला नंतर सुद्धा चावला होता अशी माहिती दिली.. व कहर म्हणजे त्यांनी मुलाला कुत्रा चावल्यावर कुठलेही रेबीजच्या लसींचे इंजेक्शन्स दिलेले नव्हते… त्यांनी जुन्या विचारांप्रमाणे बिबी ला नेऊन फुटाणे खाऊ घातले होते फक्त.. नंतर मी रेबीज या रोगाची खात्री करण्यासाठी त्या मुलाला पाण्याने भरलेला ग्लास दाखविला तर पाणी दाखवताच तो अत्यंत अस्वस्थ होत होता व स्वतःचा गळा आवळुन धरू लागला , यालाच हायड्रोफोबीया (hydrophobia) म्हणतात म्हणजे पाण्याची भीती… ही रेबीज रोगाची शेवटची पायरी असते. मी एकूण परिस्थिती बघता रेबीज रोगाची खात्री झाली व नंतर बालरोग तज्ञांशी चर्चा केली व लगेच पेशंट पुणे येथील नायडू रुग्णालयात पाठविण्यात आला.. कारण फक्त नायडू हॅास्पिटलमध्येच असे रूग्ण ॲडमिट करण्याची सोय आहे कारण अशा रोग्यांची लाळ खुप संसर्गजन्य असते. परंतु नायडू हॅास्पिटलमध्ये दुर्दैवाने त्याच रात्री तो रूग्ण मृत्यू पावला कारण रेबीज या आजारावर अजुन औषध निघालेले नाही. एकुणच रेबीज झाला की मृत्यू अटळ आहे हे दुर्दैवी सत्य आहे. वेळीच लसीकरण आणि जागरूकता असती तर हा दुर्दैवी मृत्यु आपण टाळू शकलो असतो.
माझी सर्व वाचकांना कळकळीची विनंती आहे की रेबीज वर उपचार नाही. त्यामुळे कुत्रा चावला असता लगेच योग्य उपचार घ्या. सरकारी दवाखान्यात सर्व उपचार उपलब्ध आहेत व ते ही अगदी मोफत.
मोरया हॅास्पिटलच्या संचालिका, फिजीशियन व मधुमेहतज्ञ डॉ. सौ. पुनम पिसाळ यांनी सांगितले की, पुर्वी रेबीजची लस म्हणजे पोटावर १४ इंजेक्शन्स घ्यावी लागत होती व त्याचीच बऱ्याच लोकांना भीती वाटायची. परंतु आता नविन सुधारीत लसीची फक्त ५ इंजेक्शन्स व अजुन त्याहुन सुधारीत लसीची फक्त ३ इंजेक्शन्स घ्यावी लागतात व ती पुर्वीसारखी पोटावर नाहीतर इतर इंजेक्शन्स प्रमाणे दंडावर किंवा लहान मुले असतील तर त्यांचा मांडीत घ्यावी लागतात.
त्यामुळे कुत्रे चावल्याचावल्या लगेच जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन इंजेक्शन्स घ्यावीत व या भयानक आजारापासुन दूरच रहावे.
डॉ. जनार्दन पिसाळ,
कान नाक घसा तज्ञ,
मोरया हॅास्पिटल, फलटण.
डॉ. सौ. पुनम पिसाळ,
फिजीशियन व मधुमेहतज्ञ
मोरया हॅास्पिटल, फलटण.