दैनिक स्थैर्य । दि.२१ जानेवारी २०२२ । सातारा । जिल्हयातील शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सरसकट बंदचा निर्णय मागे घेऊन करोना निर्बंधांसहीत पुन्हा सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सातारा जिल्हा भाजपाच्यावतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
भाजपच्या वतीने सादर झालेल्या निवेदनात म्हणले आहे की केवळ करोनाची भिती दाखवून महाविकास आघाडी सरकारने सरसकट शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस बंदचा निर्णय घेतला आहे. हा घेतलेला तुघलकी निर्णय अत्यंत चुकीचा व तितकाच दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ऑनलाईन शिक्षण हे सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थी व दुर्गम, अतिदुर्गम खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना बसत आहे. दोन वर्षांपासून शाळा, महाविद्यालये बंद असल्याने ग्रामीण व शहरी भागातील शैक्षणिक दरी वाढुन सर्वसामान्य जनतेची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर फेकले जात आहेत. यामुळे मुलांचे शिक्षणाचे गांभीर्य नष्ट होत असून त्यांचे नुकसान होत आहे.
राज्यभरात सर्वच व्यवसाय करोना निर्बंधासहीत सुरु आहेत. तेव्हा सरकारने करोनाचे नियम लावून शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाजपा शैक्षणिक प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्ष अमित कुलकर्णी, विठ्ठल बलशेटवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, राहुल शिवनामे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.