दैनिक स्थैर्य । दि. १८ मे २०२२ । पुणे । फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अॅन्ड सोशल फौंडेशन तर्फे सत्यशोधक हनुमंत टिळेकर आणि स्मिता टिळेकर यांच्या लग्नाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित बुद्धपोर्णिमा दिनी 16 मे २०२२ रोजी रात्री ७ वाजता महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने दानधर्म करीत सत्यशोधक पद्धतीने पुन्हा विवाह केला. सौ. माधुरी गाडेकर यांच्या स्पंदन मतीमंद शाळेतील ५० मुलांना खाऊ वाटप तसेच रतन माळी यांच्या घरटे प्रकल्प संस्थेला २५ किलो गहू आणि २५ किलो तांदूळ भेट देत अंधश्रद्धा कर्मकांड याला तिलांजली देत समाजाला व नातेवाइकांना दिशा देण्याचे काम केले.
यावेळी वधु वर यांनी राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान व महात्मा फुले समग्र वाड्मय हातात घेऊन फुलांच्या पायघड्यांवरून आगमन करीत प्रथम त्याचे पुजन आणि थोर समाजसुधारक महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थितीत माजी आमदार योगेश आण्णा टिळेकर म्हणाले कि सत्यशोधक पद्धतीने विवाह करून अंधश्रद्धा कर्मकांड याला तिलांजली देत समाजाला आमचे बंधू दिशा देण्याचे काम करत आहेत याचा आम्हास अभिमान आहे. ते यापुढे स्वतःच्या मुलाचे लग्न देखील याच पद्धतीने करतील. आपण सर्वांनी देखील आधुनिक काळाची गरज म्हणून महापुरुषांचे आचार विचार कृतीशील आचरणात आणू या आणि सत्यशोधक विवाह चळवळ मोठ्या स्वरुपात पुढे घेऊन जाऊ या.
यावेळी महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष मधुकर राऊत म्हणाले की हनुमंत टिळेकर हे ढोक व धाडगे सर यांचे सोबत सत्यशोधक विवाहाचे कार्य करतात पण आज त्यांनी स्वतः कृतीतून सत्यशोधक विवाह करून मंडळापुढे आदर्श उभा केला त्याचे मी अनुकरण करून याच पद्धतीने मी लग्नाचा ५० वा वाढदिवस सत्यशोधक पद्धतीने पुन्हा लग्न करून साजरा करणार आहे तसेच दिलीप शेलवंटे हे सुद्धा लग्नाचा २५वा वाढदिवस सत्यशोधक विवाह करणार आहेत असे सांगितले.
सत्यशोधक विवाह विधिकर्ते रघुनाथ ढोक यांनी नेहमीप्रमाणे महात्मा फुले यांचे वेशभूषेत हा ३५ वा सत्यशोधक विवाह कार्य मोफत पार पाडत त्यांनी सत्याचा अखंड गात वर वधु कडून शपथ वाचून घेतली तर महात्मा फुले रचित वराची मंगलाष्टक स्वतः वर हनुमंत टिळेकर आणि वधूची मंगलाष्टक सौ. निताताई लोणकर तर सर्वांचे वतीने ढोक व गाडेकर यांनी गायली. यावेळी वधु वर यांना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र व फुले दाम्पत्य फोटो फ्रेम मधुकर राऊत, सेवानिवृत्त अधिकारी सुधाकर गिलचे, एकनाथ ढोलेपाटील यांचे हस्ते देण्यात आले. तर गेली ३० वर्षे सामाजिक कार्य केले म्हणून संस्थेचे वतीने माजी आमदार योगेश टिळेकर व अॅड. के. टी. आरु यांचे शुभहस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा एक फुटी पुतळा एकत्र देऊन टाळ्यांचा गजरात हनुमंत व स्मिताचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे मातोश्रीं श्रीमती सुमन टिळेकर व श्रीमती सुलोचना बनकर यांचा राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सत्यशोधक विवाहाची माहिती व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पांडुरंग गाडेकर, आभार सामाजिक कार्यकर्ते एकनाथ ढोलेपाटील यांनी मानले. यावेळी अक्षता म्हणून फुलांच्या पाकळ्या वापरल्या. मोलाचे सहकार्य आकाश ढोक, वरद टिळेकर, वैष्णवी टिळेकर, रोहित टिळेकर, संजय झगडे, सौ. सुनंदा रोडे व सत्यजीत बनकर यांचे लाभले.