स्थैर्य, खंडाळा, दि. 01 : खंडाळा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरिपमधील पिक विमा भरायचा कसा,असा सवाल करित मुदतवाढ मिळावी अशी मागणी जिल्हा शेतकरी संघटना किसान मंचचे अध्यक्ष प्रमोद जाधव यांनी केली आहे.
लॉकडाऊनमुळे तीन महीने कॉमन सर्व्हिस सेंटर बंद होते. तर आता जुलै महिन्याच्या शेवटच्या तीन दिवसामध्ये जिल्हाधिकारी यांनी पत्रक प्रसिद्ध करून सर्व्हिस सेंटरमधून प्रधानमंत्री पिकविमा भरण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र पिकविम्यासाठी माहीती देताना, ऑनलाईन स्वॉप्टवेअरच्या कामात अडचणी येत आहेत. दिवसभरात चार किवा पाच फॉर्म भरून होतात. एवढ्या संथगतीने चालते. जगभर करोडो लोक फेसबुक, व्हॉट्सअॅप , इंन्सटा, आदी चांगले चालते तर पिकविमा भरतांना ऑनलाईन कामांमध्येे बोंबाबोंब असते, 7/12 दुरुस्ती, फेरफार, नवीन नोंदी करताना स्वॉप्टवेअरला अडचणी येतात.
दरम्यान विमा भरल्यानंतर नुकसान भरपाई मिळेल का ? असा सवाल जाधव यांनी केला आहे. लॉकडाऊनच्या नावाखाली सगळ सुस्त झाले असून 31जुलै शेवटचा दिवस आहे. तरी ही पिक विम्याचे फॉर्म भरले जात नाहीत. शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी,ऑनलाईन , ऑफलाईन अशा सोयी उपलब्ध करून द्यावी. अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा देण्यात आला आहे.