तासाभरात मिळतोय प्रवासाठीचा ई-पास

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न

स्थैर्य, सोलापूर, दि. 23 : कोरोना विषाणूच्या काळात सोलापुरात अडकून पडलेल्या मजूर, गावाकडे आलेल्या चाकरमान्यांना पुन्हा कामावर हजर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ई-पास काढावा लागतो. पूर्वी चार-पाच दिवस लागणारा कालावधी आता एका तासावर आला असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. दरदिवशी दोन ते अडीच हजार अर्ज प्राप्त होत असून 30 जूनपर्यंत ही प्रक्रिया चालणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लॉकडाऊनमुळे सोलापूर ग्रामीण भागात अडकून पडलेल्या मजूर, विद्यार्थी, पर्यटक, भाविक आणि नोकरदार यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी 1 मे 2020 पासून ऑनलाईन ई-पास दिला जात आहे.

ई-पासविषयी अधिक माहिती देताना उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) मोहिनी चव्हाण यांनी सांगितले की, आज 23 जून 2020 दुपारी 12 वाजेपर्यंत ग्रामीण भागात एक लाख 29 हजार 880 अर्जदारांचे अर्ज ऑनलाईन आले आहेत. 1 लाख 11 हजार 731 अर्जांना मंजुरी दिली असून 17 हजार 478 अर्ज नाकारले आहेत. मंजूर अर्जामध्ये सुमारे 97 हजार अर्ज हे सोलापूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात तर 16 हजार परवानग्या ह्या परराज्यात जाण्यासाठी देण्यात आल्या आहेत. 671 प्रलंबित अर्ज हे आज मंजूर होतील.

मजुरांना रेल्वेबरोबर एसटीचाही आधार

परराज्यातील मजूर जिल्ह्यात अडकून पडले होते. सामाजिक संस्थांच्या मदतीने सर्व मजुरांना एकत्र करणे, त्यांची संपूर्ण माहिती संकलन करणे, अन्न-पाण्याची व्यवस्था करून गट करण्यात आले होते. परराज्यांची परवानगी मिळाल्यानंतर शहर व जिल्ह्यातील तब्बल 7 हजार 845 मजूर 9 रेल्वेगाड्यांद्वारे आपापल्या राज्यात पाठविण्यात आले. एसटीने (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ) 1478 मजूरही रवाना करण्यात आल्याचे श्रीमती चव्हाण यांनी सांगितले.

आदिवासी बांधवांना ऑफलाईनचा आधार

नंदूरबार, रायगड या भागातील 461 आदिवासी बांधव जिल्ह्यात अडकून पडले होते. विशेष बाब म्हणून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ऑफलाईन परवानगी दिली जाते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे असलेल्या याद्यामधून 461 आदिवासी बांधवांना परवानगी देण्यात आली. शिवाय जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठीही ऑफलाईनची मदत घेण्यात येऊन 8 हजार 701 नागरिकांना परवानगी देण्यात आली.

असा करा अर्ज

रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाने विकसित केलेल्या www.covid19.mhpolice.in या वेबसाईटवरून ई-पाससाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. संबंधित व्यक्तीला प्रवासाचे कारण, प्रवास कोठून कुठे करणार, प्रवासाची व परतीची तारीख, सहप्रवासी संख्या, नावे, वाहन क्रमांक आदी माहिती भरावी लागते. याशिवाय अर्जदाराचे छायाचित्र, कशासाठी पाहिजे त्याचा पुरावा, ओळखपत्र किंवा कोविड-19 ची लक्षणे नसल्याचा वैद्यकीय दाखला जोडावा. परिपूर्ण अर्जाला तत्काळ परवानगी देऊन ई-पास ऑनलाईन उपलब्ध करून दिला जातो.

कसे चालते कामकाज

हे कार्यालय सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत संपूर्ण आठवडाभर सुरू आहे. एका उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार, अव्वल कारकून, मंडल अधिकारी, लिपीक, संगणक चालक व इतर कर्मचारी कामकाज पाहतात. दोन कर्मचारी हे दूरध्वनी (0217-2731007) आणि समक्ष नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत. आलेल्या ऑनलाईन अर्जावर प्रक्रिया करून योग्य कारणे असतील, सर्व पुरावे जोडले असतील तर वेबसाईटची अडचण दूर झाल्याने तत्काळ परवानगी दिली जात आहे. आता इतर जिल्ह्याचा ना हरकत परवाना लागत नसल्याने कामाची गती वाढली आहे.

तातडीसाठी केव्हाही उपलब्ध

कार्यालय सकाळी 8 ते रात्री 8 असे चालू असले तरी काहीवेळा तातडीचे वैद्यकीय कारण असते किंवा जवळच्या नातेवाईकाचे निधन होते. अशावेळी तत्काळ समन्वय साधून विशेष बाब म्हणून मध्यरात्री किंवा पहाटेही ई-पासची परवानगी दिल्याचे श्रीमती चव्हाण यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!