पालकमंत्र्यांनी घेतला विकास कामांचा आढावा
स्थैर्य, भंडारा, दि. 20 : प्रधानमंत्री आवास, रमाई घरकूल, शबरी आदिवासी घरकूल, पाणी पुरवठा योजना व घनकचरा व्यवस्थापन आदी विकास कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री सुनील केदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित आढावा बैठकीत प्रशासनाला दिल्या.
बैठकीस जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., उपवनसंरक्षक विवेक होशिंग, अपर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग तेंदूपत्ता लिलाव, विविध घरकूल योजना, पाणी पुरवठा व घनकचरा व्यवस्थापन आदी योजनांचा आढावा यावेळी पालकमंत्र्यांनी घेतला.
भंडारा येथे भव्य व सुसज्ज प्रशासकीय इमारत असावी अशी लोकप्रतिनिधी व नागरिकांची मागणी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा घेताना प्रशासकीय इमारतीसाठी तात्काळ प्रस्ताव करुन रस्त्याची व इमारतीची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
भंडारा जिल्ह्यात ८० किमीचे राष्ट्रीय महामार्ग असून १०५ किमी राष्ट्रीय महामार्ग नव्याने घोषित करण्यात आले आहेत. या कामांना गती देण्यात यावी. तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे बंद झालेल्या शेती वहिवाट रस्त्याची कामे राष्ट्रीय महामार्ग मंडळाने करून द्यावी, असे श्री.केदार म्हणाले.
यावेळी प्रधानमंत्री आवास, रमाई घरकूल, शबरी आदिवासी घरकूल शहरी व ग्रामीण आदी सर्व घरकूल कामांचा आढावा त्यांनी घेतला. पात्र प्रत्येक लाभार्थ्यांना घरकूल मिळाले पाहिजे असे सागून घरकुलांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना श्री.केदार यांनी यंत्रणांना केल्या. नगरपालिका व नगरपंचायत पाणीपुरवठा योजना आणि घनकचरा व्यवस्थापन संदर्भात पालकमंत्र्यांनी नगरपालिका व नगरपंचायत निहाय आढावा या बैठकीत घेतला.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरोत्थान महाभियान अंतर्गत भंडारा, तुमसर व पवनी शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला. नगरपालिकांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.