दैनिक स्थैर्य । दि. २७ सप्टेंबर २०२१ । फलटण । फलटण पंचायत समिती कार्यक्षेत्रातील नागरिकांनी आपली कराची चालू रक्कम ३० सप्टेंबर पर्यंत जमा करुन सहकार्य करावे, अशा सर्व करदात्यांना करांमध्ये ५ % सुट दिली जाणार असल्याचे निदर्शनास आणून देत सवलतीचा लाभ घेऊन ग्रामपंचायतीस सहकार्य करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार यांनी केले आहे.
गावातील आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी, स्वच्छता आदी नागरी सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध करुन देण्यासाठी शासकीय योजनांमधील निधीच्या पुरेशा तरतुदी करुन घेताना शासन करवसुलीचा विचार करीत असल्याने ग्रामपंचायत कर वसुली अत्यंत आवश्यक बाब असल्याचे लक्षात घेवून आगामी काळात गावात नागरी सुविधा उपलब्ध होण्यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत खातेदारांनी आपल्याकडील ग्रामपंचायत कराची रक्कम सप्टेंबर अखेरीपूर्वी भरुन सहकार्य करावे असे आवाहन गट विकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार यांनी केले आहे.
फलटण तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमधील १२ हजार २८६ खातेदारांकडील १ कोटी ८८ लाख ६३ हजार ७११ रुपये ग्रामपंचायत कर व पाणी पट्टी वसूली बाकी असून त्यापैकी दि. १५ ते २४ सप्टेंबर दरम्यान १०१ ग्रामपंचायतींमधील १०४६ खातेदारांकडील १८ लाख ८० हजार ४८६ रुपये वसूल झाला तर आज (शुक्रवार दि. २५ सप्टेंबर) रोजी लोकन्यायालयाच्या माध्यमातून ९६ ग्रामपंचायतींमधील ३१० खातेदारांकडील ६ लाख ७२ हजार १७१ रुपये कर वसूली झाली आहे. म्हणजे ९६ ग्रामपंचायतींमधील १३५६ खातेदारांकडील २५ लाख ५२ हजार ६५७ रुपये कर वसूली झाली आहे, तर १ कोटी ६३ लाख ११ हजार ५४ रुपये कर वसूली बाकी असून ग्रामस्थांनी सदर ग्रामपंचायत कर व पाणी पट्टी ग्रामपंचायत कार्यालयात दि. ३० सप्टेंबर पूर्वी जमा करुन गावातील नागरी सुविधांसाठी शासकीय निधीच्या तरतुदी करुन घेण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार यांनी केले आहे.