फलटणच्या ‘अ‍ॅग्रो पॅटर्न’ची जर्मनीला भुरळ! श्रीमंत शिवाजीराजे कृषी महाविद्यालयाचे कामकाज पाहून विदेशी पाहुणे थक्क


जर्मनीतील प्रसिद्ध उद्योग समूहाचे श्री. थोर्स्टन विल्सडॉर्फ यांनी फलटणच्या श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या व कृषी महाविद्यालयाला भेट दिली. येथील शेतकरी पूरक उपक्रम पाहून त्यांनी “अतिशय उत्कृष्ट कामगिरी” अशा शब्दांत महाविद्यालयाचे कौतुक केले.

स्थैर्य, फलटण, दि. 03 जानेवारी : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या व कृषी महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि शेतकरी पूरक कार्याची दखल आता आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे. नुकतेच जर्मनीतील प्रसिद्ध उद्योग समूहाचे प्रतिनिधी आणि मान्यवरांनी महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. येथील आधुनिक प्रकल्प आणि संशोधन पाहून विदेशी पाहुण्यांनी महाविद्यालयाच्या कामकाजावर कौतुकाचा वर्षाव केला.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित असलेल्या या महाविद्यालयात जर्मनीचे श्री. थोर्स्टन विल्सडॉर्फ (Thorsten Wilsdorf) यांनी विशेष भेट दिली. त्यांच्यासमवेत पुणे येथील अमेया पालेकर, मृण्मयी कोष्टी आणि ऋषी जैन उपस्थित होते. या मान्यवरांचे स्वागत फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कॉन्सिल सदस्य श्री. भोजराज नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी केले.

कृषी प्रकल्पांची पाहणी आणि संवाद

सदिच्छा भेटीदरम्यान जर्मनीच्या शिष्टमंडळाने महाविद्यालयातील विविध विभागांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी केवळ वर्गातील शिक्षणापुरते मर्यादित न राहता, महाविद्यालयाने राबविलेले कृषीपूरक व्यवसाय आधारित प्रकल्प आणि उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक ज्ञानासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रयोगांची त्यांनी पाहणी केली.

‘शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट कामगिरी’

महाविद्यालयातील सर्व विभागांशी संवाद साधल्यानंतर आणि एकूणच कामकाज पाहिल्यानंतर श्री. थोर्स्टन विल्सडॉर्फ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय हे केवळ शैक्षणिक ज्ञान देत नसून, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट आणि दिशादर्शक कामगिरी करत आहे,” अशा शब्दांत त्यांनी महाविद्यालयाचा गौरव केला. या भेटीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.


Back to top button
Don`t copy text!