Gen Z ठरणार भविष्यातील ‘किंगमेकर’; राजकारणाची समीकरणे बदलणार – अभिजित निंबाळकर


स्थैर्य, फलटण, दि. ४ ऑक्टोबर : मोबाईल आणि इंटरनेटच्या जगात वाढलेली ‘Gen Z’ (१९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेली पिढी) आता मतदार म्हणून सक्रिय झाल्याने भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणे वेगाने बदलत आहेत. जातीय आणि धार्मिक मुद्द्यांपेक्षा रोजगार, शिक्षण आणि पर्यावरण यांसारख्या विषयांना महत्त्व देणारी ही पिढी भविष्यातील ‘किंगमेकर’ ठरेल, असे मत वाठार निंबाळकर येथील अभिजित पंडीतराव निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे.

अभिजित निंबाळकर यांच्या विश्लेषणानुसार, भारतातील लोकसंख्येच्या जवळपास २७ टक्के (सुमारे ३५-३८ कोटी) नागरिक हे Gen Z आहेत, त्यापैकी २० कोटींहून अधिक तरुण मतदानासाठी पात्र झाले आहेत. ही पिढी “डिजिटल नेटिव्ह” असल्याने, तिचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पारंपरिक मतदारांपेक्षा वेगळा आहे.

Gen Z चा राजकारणावरील प्रभाव

निंबाळकर यांच्या मते, ही पिढी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही क्षणांत एखादा मुद्दा देशव्यापी बनवून जनमत तयार करण्याची क्षमता ठेवते. त्यामुळे Instagram, YouTube आणि X (पूर्वीचे ट्विटर) यांसारख्या प्लॅटफॉर्मवर सक्रिय असणाऱ्या नेत्यांना ते अधिक पसंती देतात. त्यांच्यामुळेच राजकीय पक्षांना पारंपरिक सभा आणि मोर्चांपुरते मर्यादित न राहता डिजिटल प्रचारावर भर देणे अपरिहार्य झाले आहे.

भविष्यातील राजकीय दिशा

२०२९ नंतर भारतातील सर्वात मोठा मतदार गट Gen Z असेल, त्यामुळे त्यांचे महत्त्व आणखी वाढेल. ही पिढी पर्यावरण, महिला सबलीकरण, स्टार्टअप्स आणि पारदर्शकता यांसारख्या मुद्द्यांवर अधिक भर देईल. त्यामुळे भविष्यातील राजकीय यश हे “काम + प्रतिमा + सोशल मीडिया” या त्रिसूत्रीवर अवलंबून असेल, असे निंबाळकर नमूद करतात. त्यांच्या मते, कामगिरी आणि विकासावर आधारित नवे राजकारण घडवण्याची क्षमता या पिढीकडे असून, आगामी प्रत्येक निवडणुकीत ते निर्णायक भूमिका बजावतील हे निश्चित आहे.


Back to top button
Don`t copy text!