दैनिक स्थैर्य । दि. ०३ एप्रिल २०२३ । मुंबई । आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये शासकीय पोर्टल, गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (GeM) वरून वस्तू आणि सेवांच्या खरेदीने 2 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ही एक उल्लेखनीय कामगिरी असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. ते आज मुंबईत GeM च्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सार्वजनिक आणि राष्ट्रीय हितासाठी डिजिटल साधन म्हणून GeM ची भूमिका त्यांनी अधोरेखित केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे देशाला ज्या गतीने पुढे नेले आहे, त्याचे जीईएम हे प्रतीक आहे असे श्री. गोयल म्हणाले.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी GeM आणि त्याच्या खरेदीदार तसेच विक्रेत्यांच्या मजबूत परिसंस्थेचे अभिनंदन केले. त्याच्या अतुलनीय पाठबळामुळेच ही ऐतिहासिक कामगिरी साध्य करता आली आहे. शासकीय खरेदीच्या पद्धतीने, महिला उद्योजक, स्टार्टअप आणि एमएसएमई क्षेत्राला न्याय्य पद्धतीने सहभागी होण्यास त्यांनी सक्षम बनवावे अशी प्रधानमंत्र्यांची इच्छा असल्याचे श्री. गोयल यांनी सांगितले.
“मला विश्वास आहे की GeM वेगाने वाढेल, याचे भविष्य खूप उज्ज्वल आहे. मी अधिकाधिक विक्रेत्यांना GeM मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करू इच्छितो जेणेकरुन त्यांनाही सरकारी खरेदी प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळेल, असेही त्यांनी सांगितले. GeM सुरु झाल्यापासून वर्षात 2 लाख कोटी रुपयांपर्यंत व्यवसाय वाढल्याने पंतप्रधानांचा हा प्रयोग यशस्वी झाल्याचे दिसून येते, असेही गोयल यांनी सांगितले.भारताने 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण 750 अब्ज (बिलियन) डॉलर निर्यातीचा टप्पा ओलांडला आहे आणि अंतिम आकडा 765 अब्ज (बिलियन) डॉलर्सच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे असेही त्यांनी नमूद केले.
नवी दिल्लीत काल जारी झालेल्या परकीय व्यापार धोरण 2023 बद्दल बोलताना ते म्हणाले की, उद्योग आणि व्यापार जगताने याचे स्वागत केले आहे. परकीय व्यापार धोरणात स्थैर्याचे प्रतिबिंब दिसून येते, असेही ते म्हणाले.GeM ची ध्येयदृष्टी आणि पुढच्या प्रवासाबद्दल GeM चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. के सिंग यांनी माहिती दिली. GeM ला एवढ्या मोठ्या उंचीवर पोहोचण्यासाठी ठामपणे पाठीशी उभ्या राहिलेल्या सर्व घटकांचे त्यांनी आभार मानले.
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 31 मार्च 2023 पर्यंत जीईएमने रु. 2 लाख कोटींचे सकल व्यापारी मूल्य (जीएमव्ही) नोंदवले आहे. एकंदर, स्थापनेपासून भागीदारांकडून मिळालेल्या भरभक्कम पाठिंब्यामुळे जीईएमने रु.3.9 लाख कोटी जीएमव्हीचा टप्पा ओलांडला आहे. जीईएमकडून 1.47 कोटींपेक्षा जास्त व्यवहार झाल्याची नोंद आहे.67,000 पेक्षा जास्त सरकारी खरेदीदार संस्थांच्या वैविध्यपूर्ण मागण्यांना जीईएम पुरवठा करत आहे. पोर्टलवर 11,700 पेक्षा जास्त वर्गांमध्ये 32 लाखांहून जास्त उत्पादने आणि 280 पेक्षा जास्त सेवा वर्गांमध्ये 2.8 लाख पेक्षा जास्त सेवांचा समावेश आहे. या व्यासपीठावरील किमान बचत जवळपास 10% इतकी असून ही रक्कम जवळपास 40,000 कोटी इतकी होते. म्हणजेच, या व्यासपीठामुळे एवढ्या सार्वजनिक निधीची बचत होते, असे विविध अभ्यासांमध्ये दिसून आले आहे.