दैनिक स्थैर्य | दि. ३१ जानेवारी २०२५ | सातारा | पुणे पाठोपाठ आता सातारा शहर तसेच कऱ्हाडमध्येही जीबीएसचे रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच जीबीएसचे 4 रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण तरुण मुले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. यातील एक रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे, तर दोन रुग्ण साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
एक रुग्ण कऱ्हाड येथे उपचार घेत आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर वैद्यकीयअधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. नागरिकांनी या आजाराची भीती बाळगू नये तसेच अफवा पसरू नये.
– डॉ. युवराज करपे,
जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यामध्ये जीबीएसच्या रुग्णावर देखरेख तसेच योग्य उपचार होत आहेत की नाही हे पाहण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथक रुग्णांवर उपचार करत आहे. आढळून आलेले जीबीएसचे हे रुग्ण परजिल्ह्यांतून आले असावेत, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्याकडे माहिती घेण्याचे काम सुरू आहे, असेही वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.