दैनिक स्थैर्य । दि. ३ जुलै २०२१ । लोणंद । लोणंद येथे पेट्रोलिंग करत असताना एका व्यक्तीची संशयावरून अंगझडती घेतली असता त्याचेकडुन जिवंत काडतूसासह गावठी कट्टा आणि चाकू सारखे घातक शस्त्र आढळून आले. गणेश सुभाष चव्हाण वय 29 रा. बेगमपूर ता मोहोळ, जि. सोलापूर असे संशयिताचे नाव आहे.
याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील निरा गावाजवळील थोपटेवाडी येथील पेट्रोल पंपावर दूपारी दोन वाजताच्या सुमारास पाचशे रूपयांचे पेट्रोल भरून पैसे न देता एमएच 12 केजी 3823 या क्रमांकांच्या काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून लोणंदच्या दिशेने एकजण पळाला होता. या इसमाला पेट्रोल पंपावरील कर्मचार्यांनी पाठलाग केला. तो लोणंद येथील जुना फलटण रोडवर आला असल्याची माहिती लोणंद पोलीस ठाण्यात मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र, कसून चौकशी केली असता त्याचे नाव गणेश सुभाष चव्हाण वय 29 रा. बेगमपूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर असल्याचे निष्पन्न होऊन त्याची वागणूक संशयास्पद वाटल्याने दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत अंगझडती घेतली. त्याच्याकडे एक गावठी बनावटीचा कट्टा, दोन जिवंत राऊंड, एक चाकु व एक पल्सर मोटार सायकल मिळून आली. यातील पल्सर मोटारसायकल ही सहकारनगर पोलीस ठाणे, पुणे येथून चोरीस गेली असून त्याबाबत सहकारनगर पोलीस ठाणे येथे गु.रु.नं. 156/2021 भा. द. वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. लोणंद पोलिसांनी सदर आरोपीस अटक केली असून त्याच्याकडे मिळून आलेल्या गावठी कट्टयाबाबत लोणंद पोलीस अधिक तपास करत आहेत.
याप्रकरणी अजयकुमार बन्सल, पोलीस अधिक्षक सातारा, धिरज पाटील अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल वायकर, पोलीस उप-निरिक्षक गणेश माने, पोलीस हवालदार संजय जाधव, पोलीस नाईक ज्ञानेश्वर मुळीक, हवालदार महेश सपकाळ, पोलीस कॉस्टेबल शिवाजी सावंत, संतोष नाळे, गोविंद आंधळे, केतन लाळगे, श्रीनाथ कदम, आविनाश शिंदे, फैय्याज शेख, विठठल काळे, दत्ता दिघे, अविनाश नलवडे, सागर धेंडे, अभिजीत घनवट, पवार यांनी कारवाईत भाग घेतला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार विष्णु गार्डे करत आहेत.