दैनिक स्थैर्य । दि. १६ मार्च २०२२ । सातारा । कुमठे (ता.सातारा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी धनंजय रामचंद्र नवले यांना येथीलच मनोज प्रकाश वाघमारे उर्फ सोन्या (वय.३०)या गावगुंड युवकाने दारूच्या नशेत शिवीगाळ करत मारहाण करण्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेने संतप्त झालेल्या येथील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी अचानक काम बंद आंदोलन सुरू केल्याने एकच खळबळ उडाली. बोरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि अभिजित यादव यांनी आंदोलकांशी चर्चा करून मारहाण कारणाऱ्यावर कारवाईची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मंगळवारी सायंकाळी उशिरा संशयित मनोज वाघमारे उर्फ सोन्या याच्या विरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कुमठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी धनंजय नवले हे शिपाई म्हणून कामावर हजर होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गावगुंड मनोज वाघमारे हा दारूच्या नशेत तेथे आला व त्याने त्यांच्याकडे ‘डॉक्टर कुठे आहेत? अशी विचारणा केली. त्यांनी डॉक्टर आत्ताच बाहेर गेलेत असे सांगितल्यावर ‘माझे डोके दुखत आहे. गोळ्या पाहिजे’ असे म्हणून गोळ्यांची मागणी केली. त्यांनी गोळ्या दिल्यानंतर ‘ तू काय डॉक्टर आहेस का? तू का गोळ्या दिल्यास?’ असे म्हणत धनंजय नवले यांना शिवीगाळ करत अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली.त्यानंतर तो तेथून निघून गेला.
या घटनेमुळे घाबलेल्या येथील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी अचानक काम बंद आंदोलन सुरू केले. घटनेची माहिती बोरगाव पोलिसांना समजताच त्यांनी तात्काळ कुमठे येथे धाव घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांनी गावगुंड मनोज वाघमारे उर्फ सोन्या यांच्या दहशतीचा आणि तक्रारींचा पाढाच वाचून त्याच्यावर कारवाई करण्याचे निवेदन दिले.सपोनि अभिजित यादव यांनी कारवाईची ग्वाही दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.