
स्थैर्य, फलटण, दि. १८ ऑक्टोबर : वसुबारसाच्या शुभ मुहूर्तावर, महाराष्ट्र शासनाचे मानद पशुकल्याण अधिकारी आणि तरडगाव येथील गोरक्षक श्री. अवधुत गोरख धुमाळ यांना ‘गोरक्षक सन्मान पुरस्कार २०२५’ प्रदान करून गौरविण्यात आले. सकल हिंदू समाज कृती समितीच्या वतीने गोसेवा आणि गोरक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात आला.
हा पुरस्कार सोहळा विंचुर्णी येथील श्री नवनाथ मंदिर, बेंद आणि महा सेवा संयोग फाउंडेशन यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला होता. श्री. अवधुत धुमाळ यांनी गेल्या अनेक वर्षांपासून गोरक्षण, गोसेवेचा प्रचार आणि गोमातेचे महत्त्व पटवून देण्यासाठी समाजात जनजागृतीचे मोठे कार्य केले आहे. त्यांच्या याच सेवाभावी वृत्तीची आणि कार्याची दखल घेत समितीने त्यांना या पुरस्काराने गौरवले.
कार्यक्रमाची सुरुवात ॲड. प्रशांत बापूसाहेब निंबाळकर यांनी केलेल्या प्रास्ताविक आणि स्वागताने झाली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रकाशमामा सोनवणे उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲड. संजय कांबळे पाटील यांनी आपल्या मनोगतातून गोरक्षणाचे महत्त्व आणि भारतीय संस्कृतीतील गोमातेचे स्थान यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास श्री नंदकुमार गायकवाड, श्री दिलीपराव राक्षे, श्री गोडसे काका, श्री जाधव काका यांच्यासह समितीचे पदाधिकारी ॲड. प्रशांत बापूसाहेब निंबाळकर, श्री अमोल रोमण, श्री अनिल निकम, श्री मारुती टकले, श्री अमोल सस्ते, ॲड. प्रशांत संजय भोसले, श्री प्रशांत गुंजाळ, श्री रोहित इंगवले हे उपस्थित होते.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाजप्रेमी नागरिक आणि गोभक्त उपस्थित होते. उपस्थितांनी श्री. धुमाळ यांच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री अनिल निकम यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.