
दैनिक स्थैर्य । दि. २३ जुलै २०२२ । सातारा ।अखिल भारत हिंदुमहासभेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्यावतीने सोमवार, दि. १ ऑगस्ट २०२२ रोजी सातारा येथे सायंकाळी साडेपाच वाजता टिळक भक्तांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम होणार आहे. हिंदुमहासभेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आनंद कुलकर्णी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
सातारा येथील मंगळवार पेठेतील श्री गुजराती महाजन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी हिंदुमहासभेचे प्रदेश अध्यक्ष अधिवक्ता गोविंद तिवारी (जळगाव), माजी प्रदेशाध्यक्ष अनुप केणी (मुंबई) यांच्यासह प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी, विविध जिल्ह्यांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी, हिंदुमहासभेचे राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, असेही क्षी कुलकर्णी यांनी सांगितले. त्यानंतर रात्री ८ वाजता याच सभागृहात महाराष्ट्र प्रदेश हिंदुमहासभा कार्यकारिणीची बैठकही होणार आहे. या बैठकीत सध्याच्या राजकीय स्थितीसह विविध विषयांवर चर्चा आणि पुढील नियोजन करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
अखिल भारत हिंदुमहासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते अधिवक्ता गोविंद गांधी (सातारा) यांचा दि. २ ऑगस्टला प्रथम स्मृतीदिन आहे. यानिमित्त २ ऑगस्टला सकाळी ११ वाजता याच सभागृहात आदरांजली सभेचेही आयोजन करण्यात आले आहे, असे सांगून श्री. कुलकर्णी यांनी या आदरांजली सभेला आणि टिळक भक्तांच्या मेळाव्याला मोठ्य़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही यावेळी केले.