दैनिक स्थैर्य । दि. ०८ एप्रिल २०२३ । मुंबई । आज सकाळीच अदानी समुहाने सीएनजी दरात घट करण्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर आता दिल्लीतही इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने दरात ६ रुपयांची घट केली आहे. IGL ने दिल्लीत CNG ची किंमत प्रति किलो ६ रुपयांनी कमी करून ७३.५९ रुपये प्रति किलो केली आहे. त्यामुळे लाखो वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कालच अदानी टोटल गॅस लिमिटेडने CNG ची किंमत प्रति किलो ८.१३ रुपये आणि PNG ची किंमत ५.०६ रुपये प्रति घन सेंटीमीटरने कमी केली होती.
‘घरगुती गॅसच्या किमती आता आंतरराष्ट्रीय हब गॅसऐवजी आयातित क्रूडशी जोडल्या आहेत. आता घरगुती गॅसची किंमत भारतीय क्रूड बास्केटच्या किमतीच्या १० टक्के असेल. आता सीएनजी आणि पीएनजीची दर महिन्याला किंमत निश्चित केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.पहिल्या वर्षी दर सहा महिन्यांनी दोनदा दर निश्चित करण्यात आले होते. नवीन फॉर्म्युल्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमती १० टक्क्यांपर्यंत कमी होतील, असे सरकारने म्हटले होते.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘घरगुती गॅसच्या किमतीची कमाल मर्यादा दोन वर्षांसाठी निश्चित केली जाते. यानंतर ते ०.२५ डॉलरने वाढवले जाईल. सध्या भारतीय क्रूड बास्केटची किंमत प्रति बॅरल ८५ डॉलर आहे. यातील १० टक्के प्रति बॅरल ८.५ डॉलर झाले. पण सरकारने त्याची कमाल मर्यादा ६.५ डॉलर ठेवली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी होणार आहेत.