कचरा वेचकांना बूट जोड्यांचे वाटप करताना श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले, अमोल मोहिते |
स्थैर्य, सातारा, दि. 18 : कचरा, प्लास्टीक निर्मुलन ही समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाची बाब आहे. सुशिक्षित लोक प्लास्टीक बाटल्या, पिशव्या, कचरा रस्त्यावर, ओढा- नाल्यात आणि उघड्यावर टाकत असतात आणि हाच कचरा उचलून त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याचे काम कचरावेचक करत असतात. कचरावेचक हा सुध्दा माणूसच आहे. त्यामुळे समाजाच्या, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार्या कचरा वेचकांनी स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. खास करुन पावसाळ्यात आरोग्य जपावे, असे आवाहन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
सातारा शहरातील कचरा गोळा करणार्या ७४ कचरावेचकांना पावसाळ्यात पायांना संरक्षण मिळावे यासाठी सौ. वेदांतिकाराजे यांनी पावसाळी बूटांचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी नगर विकास आघाडीचे प्रतोद अमोल मोहिते उपस्थित होते.
आज संपुर्ण जगावर कोरोनाचे संकट कोसळले आहे. बहुतांश आजार हे अस्वच्छता, घाण आणि कचर्यामुळे फैलावतात. कोरोनापासून बचावासाठी वारंवार हात स्वच्छ धुणे आणि मास्क वापरणे अनिवार्य झाले आहे. त्यामुळे स्वच्छतेचे महत्व आतातरी लोकांना पटू लागले आहे. कचरा वेचकांनी जर कचरा उचला नाही तर, आपल्या शहराची अवस्था काय होईल? एक इंचही जागा मोकळी राहणार नाही. त्यामुळे कचरा वेचकांचे कार्य खूप महान आहे. त्यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. पावसाळ्यातही त्यांचे कार्य सुरु असते. संपुर्ण शहराच्या आरोग्याची काळजी घेणार्या कचरा वेचकांनी स्वत:च्याही आरोग्याही काळजी घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी त्यांनी सतर्क रहावे, असे सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या.