‘गाड्या हळू चालवा’ म्हटल्याच्या रागातून गॅरेज व्यावसायिकावर हल्ला; शहर पोलिसांची धडक कारवाई, ‘असल्या प्रकाराला कुणीही पाठीशी घालणार नाही!’


फलटणमध्ये वेगाने दुचाकी चालवणाऱ्या मुलांना हटकल्याच्या रागातून गॅरेज व्यावसायिकावर हल्ला करणाऱ्यांवर शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. ४ मुख्य आरोपींना अटक तर ३ अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठवले असून, ‘असल्या प्रकाराला कुणीही पाठीशी घालणार नाही’ असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १० मार्च : शहरातून वेगाने आणि मोठ्या आवाजात दुचाकी चालवणाऱ्या तरुणांना ‘गाड्या हळू चालवा’ असे समजावून सांगायला गेलेल्या एका गॅरेज व्यावसायिकावर आणि त्यांच्या भावावर सतुराने व लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी फलटण शहर पोलिसांनी धडक कारवाई करत ४ मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून, ३ अल्पवयीन (विधीसंघर्षग्रस्त) मुलांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. तसेच, शहरात दहशत माजवणाऱ्या असल्या प्रकाराला कुणीही पाठीशी घालणार नाही, असा सज्जड दमही पोलिसांनी दिला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल विठ्ठल हिरणवाळे (रा. ब्राह्मणगल्ली, फलटण) यांचे फलटणमध्ये गॅरेज आहे. दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ते गॅरेज बंद करून बाहेर थांबले होते. त्यावेळी गोसावी वस्तीतील ७ ते ८ मुले त्यांच्या गॅरेजसमोरून मोटरसायकलचा मोठा आवाज करत आणि वेगाने गाड्या चालवत जात होती.

‘एवढा आवाज करून वेगात गाड्या का चालवता? कोणाला तरी गाडी धडकेल,’ असे अनिल यांनी त्या मुलांना हटकले. याचा राग मनात धरून या तरुणांनी अनिल हिरणवाळे आणि त्यांचे भाऊ संतोष हिरणवाळे यांना हाताने, लाकडी दांडक्याने आणि सतुराने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी २३ फेब्रुवारी रोजी फलटण शहर पोलिसांत विविध कलमांन्वये गुन्हा (गु.र.नं. ५८/२०२६) दाखल करण्यात आला होता.

फरारी आरोपींच्या आवळल्या मुसक्या

गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व आरोपी पसार झाले होते. मात्र, पोलिसांनी सर्व मार्गांनी शोध घेत आरोपींना अटक केली:

  • २४ फेब्रुवारी रोजी अटक: संदीप विठ्ठल जाधव (वय २०) आणि सुनील ऊर्फ सतीश राजु मोरे (वय २०, दोघे रा. मलठण, ता. फलटण) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.

  • ६ मार्च रोजी अटक: गणेश अजय जाधव (वय १८, रा. मलठण) हा शोध घेत असताना मिळून आल्याने त्याला अटक करण्यात आली. त्याला ११ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  • ९ मार्च रोजी अटक: प्रशांत सुनिल जुबेकर (वय २१, रा. मलठण) हा घटना घडल्यापासून परागंदा होता. गोपनीय बातमीदारामार्फत शोध घेऊन त्याला ९ मार्चला अटक केली. १० मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता, त्याला १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

३ अल्पवयीन मुलांची बालसुधारगृहात रवानगी

या हल्ल्यात सामील असलेल्या ३ विधीसंघर्षग्रस्त बालकांचा (अल्पवयीन मुले) शोध घेऊन पोलिसांनी त्यांना १० मार्च रोजी ताब्यात घेतले. त्यांना सातारा येथील बाल न्यायमंडळासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांची २३ मार्च २०२६ पर्यंत बालसुधारगृहात रवानगी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे हे करत आहेत.

‘नागरिकांना त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करणार’

सदर घटनेतील सर्व आरोपी व अल्पवयीन मुलांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही फलटण शहरातील नागरिकांना, व्यापारी वर्गाला व सर्वसामान्य लोकांना विनाकारण त्रास देणाऱ्या इसमांवर अशीच कडक कारवाई केली जाईल, तसेच असल्या प्रकाराला कुणीही पाठीशी घालणार नाही, असे फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी स्पष्ट केले आहे.


Back to top button
Don`t copy text!