
दैनिक स्थैर्य | दि. 15 एप्रिल 2025 | फलटण | साखरवाडी (ता.फलटण) येथे गांजा तस्कारांवर कारवाई करायला गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांना वाहनात हात अडकलेल्या स्थितीत फरफटत नेत जखमी केल्याचा गंभीर प्रकार घडला असून या प्रकारानंतर तस्करीतील सह आरोपी व मुद्देमाल ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे.
याबाबत फळटण ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 14 एप्रिल रोजी सकाळी 6.20 वाजता डीबी चे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांना एक पंढरी स्विफ्ट कार सुरवाडी गावाकडून साखरवाडीकडे जात आहे व त्यात गांजा आहे, अशी माहिती मिळाली. बदने यांनी तत्काळ तिथे उपस्थीत डीबी पथक व आरसीपी दोन कर्मचारी यांचे मदतीने ती गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. सदर गाडीत दोन व्यक्ती होत्या. एक चालक व एक त्याचे बाजूला बसला होता. गाडी थांबली त्यावेळी ड्रायवर बाजूने पीएसआय बदने चालकाशी चौकशी करत असताना चालकाने अचानक दरवाजा ओढून घेतला व गाडी सुरू केली. पीएसआय बदने यांचा उजवा हात दरवाजामध्ये अडकला असताना गाडी चालकाने त्याना फरफटत नेले. यात बसने यांच्या पायांची संपूर्ण कातडी जमिनीला घासलेमुळे निघाली. पुढे राम काशीनाथ भोसले यांचे शेतात (सात सर्कल रोड येथे) गाडी धडकून थांबली. त्यावेळी सदर गाडीचा चालक पळून गेला. शेजारी बसलेली व्यक्ती स्थूल असलेमुळे पळाली नाही. नंतर डीबी स्टाफ तिथे पोहचला त्यावेळी स्विफ्ट डिजायर गाडीत पांढर्या गोणीत 10.30 किलो गांजा मिळून आला.
सदर कारवाईतील गाडीचा क्रमांक एम.एच.11 बी.एच. 0404 आहे. बाजूस बसलेले इसमाने स्वतःचे नाव सांगणेस सुरवातीला नकार दिला व नंतर खोटे नाव सांगितले. नंतर त्याने त्याचे नाव लक्ष्मण रामू जाधव वय अंदाजे 60 वर्ष राहणार पिलीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर सांगितले. तर पळून गेलेल्या इसमाचे नाव रणजीत लक्ष्मण जाधव असून सदर इसमावर पूर्वी म्हसवड, लोणंद, माळशिरस या ठिकाणी 4 गांजा वाहतूक केस आहेत.
सदर बाबत गुन्हा क्रमांक 308/25 कलम बीएनएस. 132 121(1)110 3 (5) व एनडीपीएस कायदा कलम 20(ब)प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे व गुन्हीतील गाडी किंमत 3 लाख व सुका गांजा 10.30 किलो किंमत 2.5 लाख जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधिकाशक डॉ. वैशाली कडूकर, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडीक, पोलीस हवालदार नितीन चतुरे, तात्या कदम, अमोल जगदाळे, हनुमंत दडस, वैभव सूर्यवंशी, अमोल देशमुख, पीएसआय दिपक पवार, पो. ना. अमोल पवार, अमोल देशमुख यांनी केली.
सदर फरारी आरोपीचा शोध सुरू असून व जखमी आरोपीला उपचार संपलेनंतर अटक करण्याची ताजबीज ठेवली आहे.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांनी जीवावर उदार होवून केलेल्या कारवाईमुळे त्यांचे विविध स्तरातून कौतुक हाते आहे.