दैनिक स्थैर्य | दि. १० डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनने ट्रान्सफार्मर चोरीच्या अनुषंगाने फलटण शहरातील डीपी चोरीच्या रेकॉर्डवरील संतोष जगन्नाथ घाडगे, किरण भीमराव घाडगे, सागर युवराज घाडगे, प्रशांत सुनील जुवेकर (सर्व राहणार मलटण, फलटण) व रोहिदास सोपान कदम (राहणार चौधरवाडी, ता. फलटण) यांना अटक केली आहे.
ही चोरांची टोळी पोलिस स्टेशन हद्दीत रात्री संशयितरित्या मिळून आली. त्यांच्याकडे अधिक तपास केल्यावर त्यांनी काही डीपींची चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांचेकडून गॅस सिलिंडर जप्त केले आहे. या आरोपींची पोलिसांनी न्यायालयाकडून सात दिवस पोलिस कोठडी घेतली आहे. त्यांचेकडून आणखी काही गुन्हे उघड होणेची शक्यता आहे. अजूनसुद्धा डीपी चोरणारे गुन्हेगार या टोळीत आहेत, त्यांची माहिती काढणे सुरू आहे.
दरम्यान, या चोरी झालेल्या डीपींमधील तांबे खरेदी करणारे आणि चोरी करणारांची नावे सांगावीत, असे आवाहन पोलिसांनी केले असून चोरांची माहिती देणार्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, शिवाजी जायपत्रे, सपोनि, गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने, महादेव पिसे, नितीन चतुरे, तात्या कदम, अमोल जगदाळे, हनुमंत दडस यांनी केली.
ग्रामस्थांनी जागृत राहावे…
ग्रामस्थांनी ज्यांची कनेक्शन डीपीवर आहेत, त्यांनी जागृत राहून अचानक वीज गेल्यास ११२ ला कळवावे. तसेच डीपी तत्काळ चेक करावे व रात्री नवीन मोटारसायकल, चारचाकी दिसल्यास तात्काळ ११२ नंबरवर कळवावे तसेच ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करावा. अनेक गावात ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर प्रभावी होत नाही. काही गावांची यंत्रणा बंद आहे, तरी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.