दैनिक स्थैर्य । दि.१३ जानेवारी २०२२ । कराड । कराड तालुक्यातील उंब्रज येथील एकाचे खटाव तालुक्यातील चितळी येथून अपहरण करुन त्यांचा मोबाईल आणि टॅबचा पासवर्ड अनलॉक करुन क्रिप्टोकरन्सीचा ६४ लाख रुपयांचा फंड (८0 हजार डॉलर) दुसऱ्या वॉलेटला ट्रान्सफर करणाऱ्या नऊजणांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. किरण गावित, बिरजू उर्फ सतीश रजपूत उर्फ कांबळे, विशाल उर्फ सागर ननावरे उर्फ गुरव, दुशांत पांढरपट्टे, अभिजीत खंडागळे, प्रवीण शेवाळे, बाळू भोसले, किशोर निलंगे, विशाल शेवाळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
कराड तालुक्यातील उंब्रज येथील ऋषीकेश राजेंद्र शेटे यांचा क्रिप्टोकरन्सीचा ६४ लाख रुपयांचा फंड (८0 हजार डॉलर) मोबाईल आणि टॅबच्या माध्यमातून दुसऱ्या वॉलेटला ट्रान्सफर केल्याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याचा उलगडा सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केला. याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी बुधवारी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनूसार, दि. १९ डिसंेबर रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास खटाव तालुक्यातील चितळी गावच्या हद्दीत पंढरपूर ते मल्हारपेठ जाणाऱ्या रस्त्यावरील मोहितेमळा या रस्त्याने ऋषीकेश राजेंद्र शेटे उंब्रजकडे निघाले होते. यावेळी त्यांच्या चारचाकीला दुचाकीवरुन आलेल्यांनी पाठीमागून धडक दिली आणि शेटे यांना थांबवले. यानंतर दुचाकीवरील दोघे आणि अन्य दोघांनी शेटे आणि त्यांचे मित्र यांचे तोंड बांधून चारचाकीत घालून अपहरण केले. यावेळी त्यांना शिवीगाळ तसेच दमदाटी करत मारहाण केली. यावेळी शेटे यांच्याकडील ९५ हजार रुपये किमंतीचा मोबाईल हॅण्डसेट, टॅब, घड्याळ असा ऐवज चोरुन नेला. यावेळी चोरट्यांनी शेटे आणि त्यांच्या मित्राला पुसेसावळी येथील एका शेतात सोडून दिले आणि त्यांनी पलायन केले.
याबाबची तक्रार शेटे यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञातांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याचा तपास करण्याबाबत एलसीबीला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एलसीबीने तपास सुरु केला होता. दरम्यान, शेटे यांच्या मोबाईलचा पासवर्ड अनलॉक करुन घेतला होता. यामाध्यमातून अज्ञातांनी त्यांच्या क्रिप्टोकरन्सीचा ६४ लाख रुपयांचा फंड दुसऱ्या वॉलेटला ट्रान्सफर केला होता. घरी आल्यानंतर शेटे यांनी त्यांच्या वॉलेटवर याची माहिती घेतली असता ही बाब त्यांच्या निदर्शनास आली होती. दरम्यान, शेटे यांचे अपहरण करणारा आणि पैसे ट्रान्सफर करणारा ट्रेडिंगच्या व्यवसायाशी संबंधित असावा, याचा उलगडा एलसीबीला झाला होता. त्यानुसार शेटे यांच्या जवळच्याच व्यक्तीने हा गुन्हा केला असावा, असा कयास होता. त्यानुसार तपास सुरु केला असता यामध्ये फलटण, कराड, इंचलकरंजी, कर्नाटक राज्यातील निपाणी येथील अट्टल गुन्हेगारांचा समावेश असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी शिस्तबध्द तपास करत कराड, पुणे, इचलकरंजी आणि निपाणी येथून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती यावेळी पोलिसांकडून देण्यात आली.
किरण गुलाब गावीत (वय ३२ वर्षे, रा.विद्यानगर कराड), प्रवीण बाळासोा शेवाळे (वय २६ वर्षे, रा. घोगाव, ता. कराड), बाळु तुकाराम भोसले (वय ३१ वर्षे, रा. दुर्गामाता चौक, इचलकरंजी, जि. कोल्हापूर), किशोर अंबादास निलंगे (वय २७ वर्षे, रा. शहापूर, पाटील मळा, इचलकरंजी, जि. कोल्हापूर), विशाल आनंदा शेवाळे, वय ३० वर्षे (रा. मलकापूर, ता. कराड), बिरजू उर्फ सतीश विलास रजपूत उर्फ कांबळे (वय ३८ वर्षे, रा.शांतीनगर, इचलकरंजी, जि. कोल्हापूर), विशाल उर्फ सागर हरीभाऊ ननावरे उर्फ गुरव (वय २९ वर्षे, रा.सोमंथळी, ता. फलटण), दुशांत मनोहर पांढरपट्टे, वय ३१ वर्षे, रा. निपाणी जि. बेळगाव, राज्य कर्नाटक), अभिजीत सुरेश खंडागळे (वय ३५ वर्षे, रा. राधानगरी, जि. कोल्हापूर सध्या रा.निपाणी) यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अटक करण्यात आरोपींवर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, अपहरण, गर्दी मारामारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या कारवाईत एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, अंमलदार उत्तम दबडे, तानाजी माने, विश्वनाथ सपकाळ, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष पवार, संतोष सपकाळ, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, मंगेश महाडिक, लक्ष्मण जगधने, अर्जुन शिरतोडे, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, अजित कर्णे, स्वप्नील माने, विक्रम पिसाळ, मोहन पवार, वैभव सावंत, मोहसीन मोमीन, विशाल पवार, केतन शिंदे, रोहित निकम, सचिन ससाणे, संकेत निकम, प्रवीण पवार, पृथ्वीराज जाधव, स्वप्नील दौंड, शिवाजी गुरव, पंकज बेसके आदी सहभागी झाले होते.