
स्थैर्य, फलटण, दि. २७ ऑगस्ट : विविधतेतून एकतेची जोपासना करणारा गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव राहिला नसून, तो सामाजिक स्नेहबंध जपणारा आणि कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल करणारा सामाजिक व आर्थिक प्रगतीचा कणा बनला आहे, असे प्रतिपादन लेखक अनिलकुमार कदम यांनी केले आहे. या उत्सवाच्या माध्यमातून आता आपत्तीग्रस्त आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी ठोस काम करण्याची गरज असल्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
अनिलकुमार कदम यांच्या मते, गणेशोत्सव काळात मूर्तिकार, सजावट करणारे, पुरोहित, फूल-विक्रेते अशा अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांना मोठा रोजगार मिळतो, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते. त्याचबरोबर, गणेश मंडळे व्याख्यानमाला, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण आणि अन्नदान यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण काम करतात.
सामाजिक उत्तरदायित्वाची गरज
या उत्सवाचे व्यापक स्वरूप लक्षात घेता, गणेश मंडळांनी, सामाजिक संस्थांनी आणि शासनाने एकत्र येऊन या व्यासपीठाचा उपयोग अधिक रचनात्मक कामांसाठी करावा, असे आवाहन कदम यांनी केले आहे. विशेषतः, आपत्तीग्रस्तांच्या किंवा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांच्या सक्षमीकरणासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखण्याची हीच योग्य वेळ आहे. गणेश मंडळांनी शिक्षण, आरोग्य, जलसंधारण, आणि पर्यावरण यांसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करून काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी श्री गणेशाच्या चरणी व्यक्त केली आहे