स्थैर्य,फलटण: प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्या शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या बाप्पांना निरोप देताना प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप |
स्थैर्य, फलटण, दि. १ : शहरामध्ये व उपनगरांसाठी फलटण नगरपालिकेने उपलब्ध केलेल्या मूर्ती संकलन केंद्रांच्या माध्यमातून गणेश विसर्जनाचा सोहळा अत्यंत शिस्तीने व सर्व प्रकारची गर्दी टाळत साजरा करण्यात आला. मूर्ती संकलन या योजनेमुळे नीरा उजव्या कालव्याच्या ठिकाणी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गर्दी झाली नाही.
शहरामध्ये काल सकाळपासून गणेश विसर्जनाची धावपळ सुरू झाली. फलटण नगरपालिकेने विविध प्रभागात नागरिकांच्या घरी जावून मूर्ती संकलन करण्यात आल्या. या केंद्रांवर गणेशभक्त बच्चेकंपनीसह गणेश मूर्ती घेऊन येत होते. या ठिकाणी आल्यानंतर केंद्राच्या ठिकाणी गणेशाची पूजा करून मूर्ती संकलित केली जात होती. शाळा, समाजमंदिरे आणि इतर सार्वजनिक ठिकाणच्या या केंद्रांमध्ये काळजीपूर्वक मूर्ती घेवून त्यांच्यावर नगर पालिकेच्या वतीने विधिवत विसर्जन करण्यात आले. दिवसभर प्रत्येक नागरिकाच्या घरी स्वतंत्रपणे येऊन मूर्ती केंद्राला देत होता. बाजारपेठेत मूर्ती विसर्जनाची गर्दी त्यामुळे संपली. प्रत्येक वसाहतीमध्ये काही मीटरच्या अंतरावर ही मूर्ती संकलन केंद्र असलेली गाडी फिरत होती.
अनेक मंडळे आणि नागरिकांनी घरच्या घरी विसर्जन केले. विशेषतः ज्यांनी शाडूची मूर्ती स्थापन केली होती त्यांनी घरीच पाण्याच्या भांड्यांमध्ये या मातीच्या मूर्तीचे विसर्जन केले. या वर्षी शाडू मूर्तीच्या संख्येमध्ये मोठी वाढ झालेली होती. विसर्जनाच्या अडचणी आणि कोरोना संकट यामुळे नागरिकांनी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपतीला सर्वांत अधिक प्राधान्य दिले होते.