
स्थैर्य, तरडगाव, दि. ०७ सप्टेंबर : शासकीय आदेशांचे पालन करत तरडगाव, ता. फलटण येथील गणेश मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेला पूर्णपणे फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि गणरायाच्या जयघोषात बाप्पाला निरोप दिला. गावातील या विधायक आणि एकोपा जपणाऱ्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शनिवारी पार पडलेल्या या विसर्जन मिरवणुकीत गावातील सर्व गणेश मंडळे मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती. यावेळी सादर करण्यात आलेले विविध आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि मर्दानी खेळांचे देखावे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पारंपरिक वाद्यांमध्ये लेझीम, ढोल, ताशा आणि हलगीच्या तालावर संपूर्ण गाव एकवटले होते. विशेषतः नाशिक ढोलच्या सादरीकरणाने मिरवणुकीत अधिकच रंगत आणली.
गणरायाच्या जयघोषात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत सर्व मंडळे तल्लीन झाली होती. अत्यंत आनंदात, पण जड अंतःकरणाने आणि “पुढच्या वर्षी लवकर या” या भक्ती भावनेने ग्रामस्थांनी गणरायाला निरोप दिला. तरडगावच्या गणेश मंडळांनी घालून दिलेला हा आदर्श इतर गावांनीही अनुकरणीय असाच आहे.