गणेश मंडळांनी पर्यावरण जागृतीचे कार्य करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ डिसेंबर २०२१ । मुंबई । गणेश मंडळांनी मोठ्या आकाराच्या मूर्तीचा आग्रह न धरता आपल्या कार्याची उंची व व्याप्ती वाढवावी तसेच  मंडळांच्या माध्यमातून पर्यावरण जागृतीचे कार्य करावे असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

राज्यपालांच्या हस्ते राज्यस्तरीय पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा व सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेतील निवडक विजेत्यांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन लोकशाही न्यूज चॅनेल तर्फे करण्यात आले होते.

यावेळी लोकशाही न्यूज चॅनेलचे कार्यकारी संपादक नरेंद्र कोठेकर, संचालक गणेश नायडू व शिरीष गदिया प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव आता महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून देशाच्या कानाकोपऱ्यात तसेच विदेशातही साजरा केला जातो. गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून पर्यावरण जागृतीचे कार्य सर्वदूर  झाले पाहिजे. गणेश मंडळांनी पर्यावरण रक्षणासोबतच स्वच्छतेचेही काम केले पाहिजे, असेही राज्यपालांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते ठाणे येथील संदीप गाढवे, विले-पार्ले येथील प्रकाश महाडिक, बदलापूर येथील पुंडलिक नरेकर, ठाणे येथील गौरव गावंड, विरार येथील दिलीप माने, रविंद्र आणि साक्षी चौघुले, भांडुप येथील आकाश चंद्रशेखर उद्धारकर, रत्नागिरी येथील संजय वर्तक, कुर्ला येथील प्रकाश कटके व आग्रीपाडा येथील प्रेतेश राजेश शिंदे यांना पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेतील पुरस्कार देण्यात आले.

हिमांशु वसंत पवार, संकल्प मित्र मंडळ, अभिषेक नामदेव जोरी, बालगोपाल मित्र मंडळ, अलिशा दीपक भोगले, युवा गणेशोत्सव मंडळ, दादर, लौकिक श्रीरंग चव्हाण, नायगाव जयभवानी मित्र मंडळ व अक्षय अशोक पाटील शिवछत्रपती मंडळ यांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी लोकशाही न्यूज चॅनेलच्या विविध पदाधिकाऱ्यांचादेखील राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.   नरेंद्र कोठेकर यांनी प्रास्ताविक केले तर न्यूज अँकर विशाल पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.


Back to top button
Don`t copy text!