
स्थैर्य, 15 जानेवारी, सातारा : सातारा नगरपालिकेतील बहुचर्चित उपनगराध्यक्ष पदासह स्वीकृत नगरसेवक व विविध विषय समित्यांच्या सभापती पदांच्या निवडीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर येत्या 22 जानेवारी रोजी सर्वसाधारण सभेत या निवडी होणार असून, त्याबाबतचा सविस्तर कार्यक्रम नगरपालिका प्रशासनाने जाहीर केला आहे.
नगरपालिकेतील सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून या निवडींवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने गणेश जयंतीचा मुहूर्त साधल्याने या निवडींकडे केवळ राजकीय नव्हे, तर संपूर्ण सातारकरांचे लक्ष लागले आहे.उपनगराध्यक्ष पदासाठी सातारा विकास आघाडीतून कोणाचे नाव पुढे येणार, याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे. आघाडीचे नेते खासदार उदयनराजे भोसले यांचीलवकरच महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता असून, त्या बैठकीत उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, स्वीकृत नगरसेवकांची निवड आणि विविध विषय समित्यांच्या सभापती पदांसाठीही राजकीय गणिते आखली जात असून, नगरसेवकांचे दोन्ही ’राजे’ गटांकडून फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे. कोणत्या समितीचे सभापतीपद कोणाच्या गळ्यात पडणार, यावरून इच्छुकांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे.या सर्वसाधारण सभेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, या निवडींमधून आगामी काळातील नगरपालिकेचे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे गणेश जयंतीच्या दिवशी होणारी ही सभा राजकीयदृष्टीने निर्णायक ठरणार आहे.

