‘मोरया..मोरया..’ च्या जयघोषात गणेश जयंती सातारा जिल्ह्यात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी साजरी


सातारा- गणेश जयंतीनिमित्त श्री अजिंक्य गणेशमंदिरात केली आकर्षक सजावट तसेच जन्मकाळ साजरा करताना सुवासिनी. (छाया – अतुल देशपांडे, सातारा)

स्थैर्य, 23 जानेवारी, सातारा : माघ महिन्यातील शुद्ध चतुर्थीला विघ्नहर्ता गणरायाचा जन्मतिथि उत्सव साजरा होतो .यावर्षी गुरुवार दि. 22 जानेवारी च्या मुहूर्तावर जिल्ह्यातील विविध गणेश मंदिरात हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात तसेच विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.
गेले 3 दिवस सातारा शहर परिसरातील अनेक गणेश मंदिरांमध्ये यानिमित्त अथर्वशीर्षाचे सहस्त्रावर्तन पठण ,कीर्तन, नामजागर तसेच गणेश याग ,श्री सत्यविनायक पूजा आदींचे आयोजन करण्यात आले होते. अनेक गणेश मंडळांनी या निमित्त महाप्रसाद वितरण करत गणेश भक्तांना पोटभर जेवूही घातले .

सातारा शहरातील राजवाडा परिसरातील अजिंक्य गणेश मंदिरात गणेश जयंती निमित्त सोने आणि चांदीचे भव्य अलंकार गणेश मूर्तीला घालण्यात आले होते. यामुळे गणरायाचे लोभसवाणे रूप पाहण्यासाठी व डोळ्यात साठवण्यासाठी सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत गणेश भक्तांनी मंदिरात गर्दी केली होती. तसेच जयंती उत्सवानिमित्त डच रोज, कारनेशन, अंथुरियम यासारख्या देशी -विदेशी सुबक फुलांनी मंदिरातील गाभारा सजविण्यात आला होता .मंदिराच्या प्रांगणामध्ये दुपारी बारा वाजता जन्मकाळ करून सुवासिनी महिलांनी पाळणा गीते म्हणत बाल गणेशाला श्रीफळ रूपामध्ये पाळण्यात जोजवले . यावेळी वेदमूर्ती उपेंद्र शास्त्री धांदरफळे,वेदमूर्ती रुपेश कुलकर्णी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली सत्यविनायक पूजा मंडळाच्या कार्यकर्त्यांसह संपन्न करण्यात आली .दुपारी जन्मकाळानंतर महाआरती होऊन शिरा प्रसाद द्रोणातून वितरित करण्यात आला .या मंदिराच्या वतीने भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. त्याला युवकांचा मोठा प्रतिसाद लाभला. सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेतील सप्ततारा गणेश मंडळाच्या वतीने ही गणेश मंदिरापुढे दुपारी बारा वाजता जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी फुलांनी सजवलेल्या पाळण्यामध्ये महिलांनी श्रीफळ रूपी गणेशाला जोजवले, आणि पाळणा गीते म्हटली.

सातारा शहरातील सदाशिव पेठेतील पंचमुखी गणेश मंदिरातही भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली असून दुपारी जन्म काळाचे कीर्तन झाल्यानंतर साबुदाणा खिचडीचा प्रसाद वितरित करण्यात आला . शहरातील नटराज मंदिरातील दक्षिणात्य पद्धतीच्या भव्य गणेश मूर्तीला चांदीचे अलंकार घालण्यात आले होते. दुपारी जन्म काळानंतर महाप्रसाद वितरित करण्यात आला .सातारा शहरातील सदर बाजार परिसरातील कुबेर विनायक गणेश मंदिर ,देशमुख कॉलनीतील गणेश मंदिर चिमणपुरा पेठ येथील श्री गारेचा गणपती,शकुनी गणेश मंदिर ,फुटका तलाव मधील वरदविनायक मंदिर ,शुक्रवार पेठेतील विश्वविनायक मंदिर तसेच बोगदा परिसरातील खिंडीतील गणपती देवस्थान,वाई येथील कृष्णा नदीच्या घाटावरील श्री ढोल्या गणपती मंदिर येथेही माघ महिन्यातील या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

खिंडीतील गणपती देवस्थानच्या वतीने उद्या शुक्रवारी या गणेश जन्मोत्सव सोहळ्याची सांगता सकाळी लळिताच्या कीर्तनाने होणार आहे. सातारा जिल्ह्यातील अंगापूर येथील गणेश मंदिरातही परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी रांग लावली होती. रात्री उशिरापर्यंत आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिरांना विशेष झळाळी निर्माण झाली होती. मंदिर परिसरात तांबडी फुले ,जास्वंद ,दूर्वा तसेच पुष्पहार ,नारळ, मोदक, पेढे यांच्या दुकानांमध्ये भाविकांनी साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती


Back to top button
Don`t copy text!